Sunday, September 6, 2026
Homeमहाराष्ट्रआधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; अभिजीत दीपके यांचं थेट...

आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी….; अभिजीत दीपके यांचं थेट आव्हान

छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar

- Advertisement -

देशातील राजकीय घडामोडी आणि नेतेमंडळींच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्यात आता एका नव्या वादाची ठिणगी पडली आहे. आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांचे वडील भगवान दीपके यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे.

या चौकशीच्या मागणीवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, अभिजीत दीपके यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. थेट देशाच्या पंतप्रधानांनाच लक्ष्य करत, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी त्यांची पदवी सार्वजनिक करावी, त्यानंतरच मी माझ्या शैक्षणिक कर्जाचा संपूर्ण तपशील जाहीर करेन,” असा घणाघाती इशारा दीपके यांनी दिला आहे.

सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अभिजीत दीपके यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. “माझी पदवी पूर्णपणे खरी आणि वैध आहे. मला आशा आहे की देशाच्या पंतप्रधानांची पदवीदेखील तितकीच खरी असेल,” असा टोला लगावत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दरम्यान, येत्या ५ तारखेला छत्रपती संभाजीनगर येथील दीपके यांच्या निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, “या बैठकीला पक्षाचे अधिकृत प्रवक्ते आणि विविध आंदोलनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. संघटनेचा भविष्यातील रोडमॅप, पक्षविस्तार आणि आगामी रणनीती यावर या बैठकीत सखोल चर्चा केली जाईल. गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेते आपल्याला भेटायला आले असले, तरी आम्ही सध्या कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील किंवा जोडलेले नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. आवश्यकता भासल्यास जनतेच्या हक्कासाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर पुन्हा उतरून तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला.

राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या चर्चेवर बोलताना दीपके यांनी सध्याच्या लोकशाहीच्या स्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली. “आम्ही नवीन राजकीय पक्ष स्थापन करावा, अशी अपेक्षा मीडिया व्यक्त करत आहे. मात्र, सध्या आमचा असा कोणताही हेतू नाही. आम्हाला ही केवळ एक राजकीय संघटना न ठेवता लोकांची जनचळवळ म्हणून पुढे न्यायची आहे. आज देशातील राजकारणाची जी अवस्था झाली आहे, त्यामध्ये नवा पक्ष काढून काय साध्य होणार?” असा खडा सवाल त्यांनी केला.

पुढे बोलताना त्यांनी निवडणूक व्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवला. “सकाळी जनता ज्या लोकप्रतिनिधीला निवडून देते, तो संध्याकाळी दुसऱ्याच पक्षात गेलेला दिसतो. जिथे केंद्रीय यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडले जातात, निवडणुका हायजॅक होतात आणि मतदारांच्या मतांची छेडछाड केली जाते, तिथे राजकीय पक्ष स्थापन करून तरी काय उपयोग?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कर्जमाफी पुन्हा अडखळली!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांसाठी दोन स्वतंत्र याद्यांमधून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. बँकेच्या वतीने...