मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
दुष्काळ (Drought) दौऱ्याचा मोठा गाजावाजा केल्यानंतर राज्य सरकारने काढलेला शासन निर्णय हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. या निर्णयातून सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्य सरकारने २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.
या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) चंद्रपूर येथे बोलताना वडेट्टीवार यांनी निर्णयावर टीका केली. मदतीच्या नावाखाली थातुरमातुर शासन निर्णय काढला आहे. यामध्ये जुन्याच तरतुदींची पुनरावृत्ती आहे, असे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ दौरा करताना शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात जाहीर केलेली मदत सरसकट नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले आहे. पण त्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यात नाही. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत करावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
शेतकऱ्यांना (Farmer) खऱ्या अर्थाने मदत करायची असेल तर पीककर्ज कोणत्याही जाचक अटी-शर्तींशिवाय माफ करा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई जमा करा. शेतकऱ्यांना मदतीसाठी अडीच हेक्टरची मर्यादा लावू नका, अशी मागणी करताना वडेट्टीवार यांनी निवडणूक असताना तीन हेक्टर पर्यंत सरकारने मदत केली होती, याची आठवण करून दिली.




