दिल्ली । Delhi
पाकिस्तानातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना 2019 मध्ये पकडणारा पाकिस्तानी लष्करी अधिकारी मेजर मोईझ अब्बास शाह तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यात ठार झाला आहे.
ही घटना खैबर पख्तूनख्वा प्रांतातील दक्षिण वझिरिस्तानमधील सरगोधा भागात 24 जून 2025 रोजी घडली. पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) च्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान मेजर मोईझ अब्बास शाह आणि लान्स नाईक जिब्रान यांचा मृत्यू झाला. या चकमकीत TTP चे 11 दहशतवादीही ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे.मेजर मोईझ अब्बास शाह हे पाकिस्तान लष्करातील एक अधिकारी होते. ते अनेक दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाले होते. मात्र, त्यांची सर्वाधिक चर्चा झाली ती 2019 मधील बालाकोट एअर स्ट्राइकनंतर.
14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानातील बालाकोट येथील जैशच्या तळांवर एअर स्ट्राईक केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी, 27 फेब्रुवारीला पाकिस्तानने भारतावर हवाई प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग-21 बायसन लढाऊ विमानातून पाकिस्तानी एफ-16 विमानाचा पाठलाग केला आणि ते पाडलं. मात्र, त्यांचे मिग-21 देखील पाकच्या क्षेपणास्त्राला बळी पडले आणि त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरावं लागलं.
पीओकेमध्ये पॅराशूटद्वारे उतरल्यानंतर अभिनंदन यांना स्थानिक लोकांनी हल्ला करून पकडले. त्यावेळी त्यांनी स्वतःचा बचाव करत हवेत गोळ्या झाडल्या. अखेर पाकिस्तानी लष्कराने त्यांना ताब्यात घेतलं. त्यावेळी मेजर मोईझ अब्बास शाह हेच अधिकारी होते, ज्यांनी अभिनंदन यांना पकडलं. काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी त्या वेळी हा युद्ध नियमांचा भंग असल्याचंही नमूद केलं होतं. मेजर मोईझ यांच्या मृत्यूमुळे पाकिस्तानातील अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झालं आहे. TTP सारख्या संघटना पाकिस्तानातील लष्करावर सातत्याने हल्ले करत आहेत. अशा प्रकारच्या घटनेमुळे पाकिस्तानची दहशतवादविरोधी रणनीतीही प्रश्नचिन्हात सापडली आहे.




