नवी दिल्ली | New Delhi
देशभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह सुरू असताना आणि ठिकठिकाणी देवीचा जागर सुरू असतानाच मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमध्ये एक मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ग्वाल्हेर (Gwalior) येथील प्रसिद्ध शीतला माता मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. धान्याने भरलेला एक अनियंत्रित ओव्हरलोड ट्रक मंदिराच्या मार्गावर घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात (Accident) १५ जणांचा मृत्यू झाला असून, ३९ जण जखमी झाले आहेत. तर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे.
मध्यरात्री घडली थरारक घटना
मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवानिमित्त शीतला माता मंदिरात रात्रंदिवस भाविकांची मोठी गर्दी असते. शनिवारी मध्यरात्री १:३० ते २ वाजेच्या सुमारास चिनोरकडून धान्याने (तांदूळ) भरलेला एक ओव्हरलोड ट्रक तीव्र उतारावरून येत असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. हा अनियंत्रित ट्रक रस्त्यावरील पोलिसांचे बॅरिकेड्स आणि सुरक्षा चेकपोस्ट तोडून थेट मंदिराच्या मार्गावर (Route) घुसला. मंदिरात दर्शनासाठी रस्त्यावरून पायी जाणाऱ्या व थांबलेल्या भाविकांच्या गर्दीला या ट्रकने अक्षरशः चिरडले. त्यानंतर ट्रक रस्त्यालगतच्या दुकानांच्या भिंतीला आणि मुख्य प्रवेशद्वाराला जाऊन धडकला. या जोरदार धडकेमुळे दुकानाची भिंत कोसळली आणि अनेक भाविक ढिगाऱ्याखाली दबले गेले. या अपघातामुळे घटनास्थळी एकच आक्रोश आणि गोंधळ उडाला.
प्रशासकीय यंत्रणा आणि मदतकार्य
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रुचिका चौहान, एसएसपी धर्मवीर सिंह यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना (Citizen) बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. ग्वाल्हेरच्या जयारोग्य रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये जखमींना दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुधीर सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तर जखमी ३९ जणांपैकी ७ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना फ्रॅक्चरसह गंभीर दुखापती झाल्या आहेत. या दुर्दैवी घटनेत सुरक्षेसाठी व बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असलेले दोन पोलीस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले आहेत.
बंदी असतानाही ट्रक आत कसा शिरला? प्रशासनाचा सवाल
ग्वाल्हेरच्या जिल्हाधिकारी रुचिका चौहान व एसएसपी यांनी सांगितले की, नवरात्रोत्सवादरम्यान या तीव्र उताराच्या मार्गावर जड व अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. तसेच सुरक्षेसाठी तेथे पोलिसांची चेकपोस्ट आणि बॅरिकेड्सही तैनात होते. असे असतानाही हा ओव्हरलोड ट्रक आत कसा घुसला, याबाबत मोठी शंका उपस्थित होत आहे. ट्रकचे ब्रेक फेल झाल्यासारख्या तांत्रिक बिघाडाची चौकशी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (RTO) पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून, प्रशासनाकडून या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. या दुर्घटनेमुळे नवरात्रीच्या आनंदात असलेल्या भाविकांमध्ये व नागरिकांमध्ये भीती आणि शोककळा पसरली आहे.




