मुंबई | Mumbai
ख्रिसमसच्या सुट्टीसाठी गावाकडे जाताना बंगळुरू-राष्ट्रीय महामार्गावरून (Bangalore-National Highway) प्रवास करतांना सांगलीच्या (Sangli) जत तालुक्यातील (Jat Taluka) मोरबगी गावच्या एकाच कुटुंबातील सहा जणांचा अपघातात (Accident) मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन अल्पवयीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. हा अपघात बंगळुरु जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळील टी बेगूर भागात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या दोन ट्रकची धडक झाली. त्यानंतर एक कंटेनर कार आणि दुचाकीवर पलटी झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातावेळी कारमध्ये पाच जण होते, त्यात दोन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. कंटेनर (Container) ट्रकचे वजन जास्त असल्याने कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि कारच्या आत असलेले लोक चिरडले गेले. त्यामुळे कारमधील सर्वांचा जागीच मृत्यू (Death) झाला.
दरम्यान, या अपघातात पती चंद्रम इगाप्पागोळ (४६), पत्नी धोराबाई (४०) मुलगा गण (१६), मुलगी दिक्षा (१०), आर्या (०६), चंद्रम एगाप्पागोळ भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी (३५) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. चंद्रम इगाप्पागोळे हे जत तालुक्यातील मोराबागदी येथील रहिवासी आहेत. ते एका सॉफ्टेवेर कंपनीचे मालक असल्याची देखील प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे जत तालुक्यावर (Jat Taluka) शोककळा पसरली आहे. याप्रकरणी नेलमंगळा वाहतूक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सूरू आहे.