मुंबई |प्रतिनिधी| Mumbai
आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे सहावीतील शिकणार्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याच्या घटनेचे पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी या घटनेबद्दल स्थगन प्रस्ताव मांडत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कायदा आणि सुव्यस्थेवरून सरकारवर टीकास्त्र सोडले. तर या मुलीवरील उपचाराचा सर्व खर्च सरकार उचलेल, असे आहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले.
राज्यात मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली असून तेथील पोलीस अधीक्षकांवरही भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचे सांगत वडेट्टीवार यांनी या गंभीर विषयावर सविस्तर चर्चेची मागणी केली. याच मुद्द्यावर काँग्रेसच्या नाना पटोले यांनीही सरकारवर टीका केली. शाळेत शिकणार्या अल्पवयीन मुली जर असुरक्षित असतील तर ती राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना अशी घटना घडणे हे गृहविभाग आणि सरकारचे अपयश असल्याचे टीका पटोले यांनी केली.
या घटनेत अकरा वर्षांच्या मुलीचा चेहरा गंभीररीत्या भाजला असून तिच्या डोळ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पुढे प्लास्टिक सर्जरी करावी लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील मोठ्या रुग्णालयात तिचे उपचार करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
दरम्यान, विखे-पाटील यांनी सभागृहाला या घटनेची माहिती देताना सांगितले की, तेरा वर्षांची मुलगी शाळेतून सायकलवरून घरी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या एका तरुणाने तिच्यावर अॅसिड फेकले. हा तरुण वडगावपान गावातीलच असावा, असा संशय असून आरोपीच्या शोधासाठी गावकर्यांची मदत घेतली जात आहे. मुलीवर सध्या प्रवरा मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या उपचारांचा 100 टक्के खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे विखे-पाटील यांनी यावेळी जाहीर केले.




