Saturday, June 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजएसटी बसस्थानकांच्या परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकी विरोधात धडक मोहीम

एसटी बसस्थानकांच्या परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकी विरोधात धडक मोहीम

नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सर्व बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी राज्यभर विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शनिवारी केली. ५ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत राज्यातील सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी व अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशांच्या अनुषंगाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहनांद्वारे प्रवासी घेणे अथवा उतरविण्यावर बंदी राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. एसटी महामंडळ ही राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून, तिच्या उत्पन्नावर परिणाम करणारी तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी अवैध प्रवासी वाहतूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.

या मोहिमेत विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक तसेच सुरक्षा आणि दक्षता विभागाचे अधिकारी तसेच पर्यवेक्षक यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. विभाग प्रमुखांना संयुक्त पथके स्थापन करून नियमित तपासण्या करण्याचे तसेच नियमभंग करणाऱ्या वाहनांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रवाशांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे हे एसटी महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीचे आर्थिक नुकसान होतेच, शिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे बसस्थानक परिसरात कायद्याचे काटेकोर पालन करून अवैध वाहतुकीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) गुटखा मुक्त महाराष्ट्र मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत राज्यभरात करण्यात आलेल्या कारवाईत गुटखा, पानमसाला विक्रेत्यांना...