मुंबई । Mumbai
गेल्या काही दिवसांपासून अभिनेते राहुल सोलापूरकर हे चर्चेत आले होते. एका पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत त्यांनी केलेल्या एका विधानावरून वाद निर्माण झाला होता. आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी मिठाईच्या पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटले, असं विधान राहुल सोलापूरकर यांनी केले होते.
राहुल सोलापूरकर यांच्यावर या विधानासाठी सामान्य नागरिकांप्रमाणेच राजकीय वर्तुळातूनही टीका-टिप्पणी केली जात होती. यावर मोठी चर्चा सुरू झाल्यानंतर आता राहुल सोलापूरकर यांनी या विधानामागची त्यांची नेमकी भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, या विधानामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यासाठी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो, असंही त्यांनी जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये नमूद केलं आहे.
“दीड दोन महिन्यापूर्वी एका पॉडकास्टमध्ये मी ५० मिनिटे मुलाखत दिली होती. त्यादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना मी इतिहास आणि इतिहासातल्या रंजक गोष्टी कशा बदलतात याविषयी बोलताना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटका या विषयावर काही गोष्टी बोलतो. बिकानेरच्या राजवाड्यातील काही पुरावे. राजस्थानची काही कागदपत्रे, फारसी, उर्दू अशा ग्रंथांमध्ये आणि औरंगजेबाच्या जवळच्या माणसांच्या काही गोष्टी ज्या वाचायला. अभ्यासायला मिळाल्या होत्या त्यामधल्या काही गोष्टी सांगून मी बोललो. हे बोलताना महाराजांनी कोणाला रत्न दिली, पैसे दिले, काय काय केलं याचे फक्त एकत्रीकरण करताना महाराजांनी औरंगजेबाच्या जवळच्या इतर लोकांना कशा पद्धतीने आपल्या बाजूला वळवून घेतलं आणि तिथनं स्वतःची सुटका करून घेतली हे सांगितले. हा विषय मांडताना मी लाच हा शब्द वापरला,” असं राहुल सोलापूरकर यांनी म्हटलं.
“छत्रपती शिवराय फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले याविषयी मी वेगळं सांगायची गरज नाही. किंबहुना छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची भूमिका मी अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडली होती. जगभर गेली अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीची अनेक व्याख्याने उत्तमरीत्या देण्याचा मी प्रयत्न करतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा हे माझ्या मनात येऊ सुद्धा शकत नाही. त्याचा विचार सुद्धा होऊ शकत नाही. कोणीतरी फक्त त्या पॉडकास्ट मधील दोन वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असं मी म्हटलं असं दाखवण्यात आलं. त्यावरून संपूर्ण गदारोळ उठवण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा नखभर सुद्धा अपमान करण्याचा माझा हेतू नाही,” असंही सोलापूरकर म्हणाले.