मुंबई | Mumbai
महाराष्ट्र हा पुरोगामी आणि विकसित राज्य म्हणून ओळखला जातो. अशोक खरात प्रकरण हे निंदनीय आहे, त्यामध्ये कोणीही त्याची बाजू घेण्याचे किंवा समर्थन करण्याचे कारण नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय नेत्याने अशोक खरात प्रकरणाचे समर्थन केलेले नाही. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मौन बाळगल्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. यादरम्यान अदिती तटकरे यांनी आज माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
अशोक खरातचे प्रकरण महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय मंडळींसाठी एक धडा आहे. आपण पुरोगामी महाराष्ट्रात वावरत असताना कुठलाही सल्ला घेणे किंवा भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी धडा आहे, असे वक्तव्य राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.
हा अतिशय घृणास्पद, निंदनीय प्रकार
“अतिशय घृणास्पद आणि निंदनीय प्रकार आहे. याचं समर्थन किंवा यासंदर्भात वेगळी भूमिका घेण्याचा कोणाचाच दृष्टिकोन असण्याचे काही कारण नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संबंध प्रकरणात एक एसआयटी स्थापन केलेली आहे. एसआयटीच्या ज्या इनचार्ज आहेत, त्या एक महिला अनुभवी पोलीस अधिकारी दिलेल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी भूमिका आहे…त्यांच्या मंत्रिमंडळातील मी एक सदस्य आहे. त्यामुळे जी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, तीच मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून माझा भूमिका आहे.”
कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे
“ज्या महिलांवर अन्याय झाला, ज्या पीडित महिला आहेत यांना न्याय मिळणं हा मूळ मुद्दा आहे. त्यामुळे एक महिला म्हणून, एक लोकप्रतिनीधी म्हणून आणि महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणूनही एक विनंती केली की त्या पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे. त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे असे,” अदिती तटकरे म्हणाल्या.
कुठल्याही पक्षाच्या महिलेवर आरोप केले जात आहे
अशोक खरातसोबत अनेक नेत्यांचे फोटो समोर आले आहेत, असा प्रश्न विचारला असता, या प्रकरणात वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेत्यांचे फोटो समोर आले. पण कुठल्याही राजकीय पक्षातील नेत्याने अशोक खरात याने जे कृत्य केले त्याचे समर्थन केले का? त्याची बाजू कोणी मांडली का? तर नाही. याचा अर्थ असा की, वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमात अशोक खरातसोबत त्यांची भेट झाली असेल. पण आज कोणीतीही महिला किंवा कुठल्याही पक्षाची महिला असो, त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. कोणी रश्मी ठाकरेंचं नाव घेतं आहे, कोणी नीलम गोऱ्हेंचं नाव घेत आहे, मी स्पष्टपणाने भूमिका का मांडत नाही म्हणून कोणी माझं नाव घेतं आहे. पण सगळ्या पक्षांचे लोक वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमात त्याला (अशोक खरात) भेटले असतील. याचा अर्थ असा होत नाही की, या निंदनीय घटनेची कोणाला माहिती होती. कारण जर माहिती असती तर कुठलाही महाराष्ट्रातील राजकारणी त्याला भेटला नसता, याची मला एक लोकप्रतिनीधी म्हणून खात्री आहे, असा विश्वास आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.





