मुंबई | Mumbai
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे यांचे एक विधान चांगलेच गाजले. महावीर जयंतीनिमित्त बोरीवली येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी गुरुदेवजींच्या आशीर्वादाने माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली. हा तर चमत्कार झाला, असे विधान केले होते. यावरून विरोधकांनी रितू तावडेंवर हल्लाबोल केला. सतत टीका होत असल्याने महापौर रितू तावडे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावरील होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले.
त्यांच्या जिभेला हाडच राहिलेले नाही
“शिवसेना उबाठाचे भोंगे संजय राऊत त्यांच्या जिभेला हाडच राहिलेले नाही. एका महिलेबाबत तुम्ही असे बोलता. ज्यावेळी तुमच्यावर ईडी लागली, तुमच्या पत्नी आणि मुलींवरती आले तेव्हा तुम्ही उफाळून बाहेर आलात. तेव्हाच तुम्हाला कळत की, तुमच्याही घरी आयाबहिणी आहेत. त्यांनी केलेले विधान हे लाजिरवाणे असून एका महिलेच्या बाबतीत तुम्ही असे बोलता? मी एका सुशिक्षित घरातील महिला आहे. त्यांना काही उरले नसेल, पण आम्हाला आजही बोलण्याच्या मर्यादा आहेत. अशोक खरातसारख्या माणसाबरोबर त्यांनी इतक्या मोठ्या व्यक्तींशी तुलना केली, अशा लोकांचा मी पूर्णपणे निषेध करते.” असे म्हणत महापौर रितू तावडे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.
तेव्हा त्यांनी आमच्याकडून ‘ओम’चा उच्चार करून घेतला
गुरूदेव नम्रमुनी महाराज यांना मी भेटले मला गळ्याचा त्रास होत होता. त्यावेळी त्यांनी मला ओमचा उच्चार करण्यास सांगितले. ज्यावेळी आपण ओमचा उच्चार करतो, त्यावेळी आपल्या गळ्याचा एक व्यायाम होतो आणि गळ्याला आराम मिळतो. आम्ही गुजरातला त्यांच्या आश्रमात गेलो होतो, तेव्हा त्यांनी आमच्याकडून ‘ओम’चा उच्चार करून घेतला होता. त्यानंतर मी माझ्या घरी देखील ‘ओम’चा उच्चार करते. याचा परिणाम असा झाला की माझा आवाज चांगला झाला. त्यामुळे मी माझी भावना त्या कार्यक्रमात व्यक्त केली याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचे काम नव्हते. असे स्पष्टीकरण रितू तावडे यांनी दिले.
इराणची अमेरिकेला हादरवणारी धमकी! मायक्रोसॉफ्ट, ॲपल पासून ते ‘या’ कंपन्यांवर हल्ला करण्याची धमकी
नम्रमुनी महाराजांना फॉलो करतो
स्वामी समर्थ महाराज, साईबाबा आम्ही सर्व भक्त आहोतच. नम्रमुनी महाराज यांना आम्ही फॉलो करतो. मग एवढ्या मोठ्या राष्ट्रसंत नम्रमुनी महाराज यांच्या बाबतीत मी कार्यक्रमावरून घरी देखील पोहोचले नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या बातम्या समोर आल्या. मला या गोष्टीची किळस येते. तुम्ही कोणाबरोबर कोणाला जोडता? जे २७ आणि २० पैसे घेऊन ट्रोल करतात त्यांच्या घरात आया-बहिणी आहेत की नाही? कशा पद्धतीने तुम्ही ट्रोल करता? एखाद्या महिलेबाबत तुम्ही कोणत्या थराला जाऊन ट्रोलिंगची भाषा वापरता? असं म्हणत रितू तावडे यांनी संताप व्यक्त केला.
संजय राऊत काय म्हणाले होते?
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केलेल्या विधानावर खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, खरातच्या औषधामुळेदेखील अनेकांना बर वाटले. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणाला कोणत्या औषधाने बरे वाटेल. एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दुसऱ्या कुठल्या अवयवाला गुण असतो,” अशा शब्दात खिल्ली उडवली.





