Friday, May 3, 2024
Homeनाशिककृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेलाही सुरूवात झाली असून याअंतर्गत कृषी शाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश दिले जाणार आहेत. प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली असून, ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी 16 डिसेंबरपर्यंत मुदत असणार आहे.

- Advertisement -

चारही कृषी विद्यापीठांत प्रवेशप्रक्रिया सुरू असून प्रवेशासंदर्भातील सविस्तर दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार ऑनलाइन प्रवेश अर्ज व आवश्यक कागदपत्रे स्कॅन स्वरूपात संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी 16 डिसेंबरपर्यंत मुदत असेल. 20 डिसेंबरला अंतरिम गुणवत्तायादी प्रसिद्ध केली जाईल.

त्यावर ऑनलाइन तक्रार नोंदणीसाठी 21 व 22 डिसेंबरपर्यंत मुदत असेल. दरम्यान, महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी), डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (रत्नागिरी) या विद्यापीठांत उपलब्ध असलेल्या पदवी अभ्यासक्रमाला या प्रवेशप्रक्रियेच्या माध्यमातून प्रवेश दिले जातील.

यात बी.एस्सी. शिक्षणक्रमातील कृषी, उद्यानविद्या, वनविद्या, मत्स्यविज्ञान, बी.टेक. अभ्यासक्रमांतर्गत कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन या शाखांसाठी प्रवेश दिले जाणार आहेत.

मॅनेजमेंट कोट्याचे प्रवेश जानेवारीत

सध्याच्या वेळापत्रकानुसार संकेतस्थळावर महाविद्यालयनिहाय उपलब्ध जागांची प्रसिद्धी 12 जानेवारीला केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित महाविद्यालयाकडे व्यक्तिशः प्रवेशाकरिता अर्ज दाखल करण्याची मुदत 14 व 15 जानेवारी असेल. महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर आणि सूचनाफलकावर निवड यादी 16 जानेवारीला जारी केली जाईल, तर प्रवेशासाठी 17 व 18 जानेवारीची मुदत असेल. वर्ग सुरू होण्याची तारीख 11 जानेवारी निश्चित करण्यात आली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या