जळगाव । प्रतिनिधी Jalgaon
शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विद्युत रोहित्रात हात घालून एका जणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना 9 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली.
सतर्क वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांसह पोलीस अधीक्षक कार्यालयात बॉम्ब शोध पथकात कार्यरत कर्मचार्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातील प्रौढाचे प्राण वाचविले आहेत. कैलास नारायण भांगे (46,रा. साई इजारा, ता. महागाव,जि.यवतमाळ) असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्या प्रौढाचे नाव आहे. दरम्यान, भांगे यांना जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
…तर काही वेळातच झाला असता मृत्यू
9 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता कैलास भांगे हे बसस्थानकाकडून आले व मनपाच्या स्ट्रीट लाईटच्या पोलवरील उघड्या डीपीजवळ गेले. डीपीमधील वीजतारांना स्पर्श करणार तोच हा प्रकार याठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारी शितल पाटील तसेच याचवेळी याठिकाणाहून जात असलेल्या बीडीडीएसचे कर्मचारी प्रकाश महाजन यांच्या लक्षात आला.
शितल पाटील यांच्यासह महाजन या दोघा कर्मचार्यांनी तत्काळ भांगे या जोरदार धक्का देवून डीपीजवळून बाजूला केले. यानंतर पुन्हा भांगे याने उठून डीपीमधील तारांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान घटनास्थळी पोहचलेल्या कर्मचार्यासह नागरिकांनी भांगे यास बाजूला केले. कर्मचार्यांना उशीर झाला असता, वीज तारांना स्पर्श होवून काही वेळातच भांगे यांचे प्राण गेले असते, अशी यावेळी चर्चा होती.
घरगुती कलहातून आत्महत्येचा प्रयत्न
वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर, सुनील निकम, योगेश पाटील, किरण मराठे व महेश अहिरे यांनी भांगेला पकडून वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणले, मात्र तेथेही या सर्वांना झटका देऊन पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्या पकडून ठेवले. यानंतर भांगे यास
जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. भांगे हा ऊस तोड करणार्या कंत्राटदाराकडील ट्रॅक्टरवर चालक आहे. घरगुती कलहातून संतापात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.




