अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राहुरी येथील अॅड. मनीषा आणि अॅड. राजाराम आढाव दाम्पत्य खटल्यातील माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याने मित्राकडे खुनाची कबुली दिली. या कृत्याबद्दल पश्चताप होत असल्याची भावना व्यक्त केली, असे हर्षलचा उंबरे (ता. राहुरी) येथील मित्राने सरतपासणीत सांगितले. दरम्यान, त्याने या खटल्यातील संशयित आरोपींना न्यायालयात ओळखले. उंबरे गावातील काही संशयित आरोपी रहिवाशी असल्याने त्यांना पूर्वीपासूनच ओळखत असल्याचे सांगितले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या न्यायालयात आढाव दाम्पत्याच्या खून खटल्याची सुनावणी सुरू आहे. अॅड. राजाराम आढाव यांना ओळखणारे आणि राहुरी न्यायालयात प्रॅक्टीस करणारे वकील यांची उलट तपासणी पूर्ण झाली. त्यानंतर माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याच्या मित्राची सरतपासणी आणि उलट तपासणी झाली. त्याने सरतपासणीत सांगितले की, उंबरे गावातील बसस्थानकावर 26 जानेवारी 2024 रोजी असताना, त्यावेळेस हर्षल ढाकणे तेथे आला. तो नैराश्यग्रस्त होता, त्यामुळे त्याला असे काय दिसतो, असे विचारले. त्यावर तो रडायला लागला. आपल्या हातून मोठे पाप घडले, असे म्हणून अॅड. आढाव दाम्पत्याला मारल्याची कबुली दिली. त्याचे सांत्वन करून घडलेली माहिती पोलिसांना सांगण्यास सांगितले.
संशयित आरोपींच्या वतीने अॅड. सतीश वाणी यांनी उलट तपासणी घेतली. हर्षलच्या मित्राने मोबाईलवर आलेल्या कॉलच्या अनुषंगाने माहिती मिळविली. संशयित आरोपींच्या अटकेनंतर या घटनेची माहिती समजली ? असे प्रश्न विचारण्यात आले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सरकारतर्फे काम पाहत आहेत. माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणेच्या वतीने अॅड. परिमल फळे हे काम पाहत आहेत. अॅड. वाणी यांना अॅड. वैभव बागूल हे सहाय करत आहेत.