Saturday, May 30, 2026
Homeराजकीयपश्चिम बंगालमध्ये भाजप 'सरप्राईज' देणार? ममता बॅनर्जींनतर पश्चिम बंगालला मिळणार दुसऱ्या महिला...

पश्चिम बंगालमध्ये भाजप ‘सरप्राईज’ देणार? ममता बॅनर्जींनतर पश्चिम बंगालला मिळणार दुसऱ्या महिला मुख्यमंत्री?

कोलकाता । Kolkata

- Advertisement -

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणाने अनपेक्षित वळण घेतले आहे. बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता सत्तेची धुरा नेमकी कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत.

दरम्यान, भाजपच्या ‘फायरब्रँड’ नेत्या आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अग्निमित्रा पॉल यांना पक्षाच्या हायकमांडने तातडीने दिल्लीला बोलावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बंगालच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आता पॉल यांचे नाव सर्वात आघाडीवर आले असून, भाजप बंगालमध्ये ‘महिला कार्ड’ खेळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.

आतापर्यंत बंगाल विजयाचे शिल्पकार मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित मानले जात होते. मात्र, ऐनवेळी अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीत पाचारण केल्यामुळे सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत. दिलीप घोष, रूपा गांगुली आणि शामिक भट्टाचार्य यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू असतानाच, पॉल यांनी या शर्यतीत ‘डार्क हॉर्स’ म्हणून एन्ट्री घेतली आहे. दिल्लीच्या धर्तीवर बंगालमध्येही महिला नेतृत्वाला संधी देऊन भाजप सर्वांना धक्का देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पश्चिम बंगालमध्ये महिला मतदारांची संख्या निर्णायक आहे. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना टक्कर देण्यासाठी भाजपकडे अग्निमित्रा पॉल यांच्या रूपाने एक उच्चशिक्षित आणि आक्रमक महिला चेहरा उपलब्ध आहे. प्रचारादरम्यान महिला सुरक्षेचा मुद्दा कळीचा ठरला होता, अशा परिस्थितीत एका सक्षम महिला नेत्याच्या हाती राज्याची सूत्रे देऊन भाजप महिला मतदारांना मोठा संदेश देऊ पाहत आहे.

राजकारणात येण्यापूर्वी अग्निमित्रा पॉल या एक यशस्वी उद्योजिका आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर होत्या. श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती यांसारख्या दिग्गज कलाकारांसाठी त्यांनी काम केले आहे. मात्र, २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी अल्पावधीतच आपल्या कामाचा ठसा उमटवला. एमबीए आणि फॅशन टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतलेल्या पॉल यांची प्रशासकीय समज दांडगी आहे. आसनसोल दक्षिण मतदारसंघातून त्यांनी तृणमूलच्या तापस बॅनर्जी यांचा ४० हजारांहून अधिक मतांनी पराभव करून आपली ताकद सिद्ध केली आहे.

भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून काम करताना त्यांनी बंगालच्या कानाकोपऱ्यात पक्ष संघटना मजबूत केली आहे. विशेषतः त्यांनी राबवलेली ‘स्वसंरक्षण कार्यशाळा’ प्रचंड लोकप्रिय ठरली. ममता बॅनर्जी यांनी पराभवानंतरही रस्त्यावर उतरून लढा देण्याचे संकेत दिले आहेत. अशा वेळी ममता दीदींच्या आक्रमकतेला त्याच भाषेत उत्तर देऊ शकणाऱ्या ‘निडर’ नेत्याची भाजपला गरज आहे.

भाजप नेहमीच हरियाणा आणि राजस्थानप्रमाणे अनपेक्षित निर्णय घेण्यासाठी ओळखला जातो. आता सुवेंदू अधिकारी यांचा अनुभव आणि अग्निमित्रा पॉल यांची नवीन ऊर्जा यांचा मेळ घालून भाजप बंगालसाठी कोणता ‘कॅप्टन’ निवडणार, याची अधिकृत घोषणा दिल्लीतील बैठकीनंतर लवकरच होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

दै.‘देशदूत’आयोजित ‘पंचवटी अ‍ॅनेक्स प्रॉपर्टी एक्स्पो’ला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik दैनिक ‘देशदूत’च्या वतीने आयोजित ‘पंचवटी अ‍ॅनेक्स (जत्रा चौफुली) प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ च्या दुसऱ्या दिवशी नाशिककरांनी प्रदर्शन स्थळावर गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद...