मुंबई । Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची गेल्यावर्षी दसऱ्याच्या दिवशी १२ ऑक्टोबरला वांद्रे येथील कलानगर परिसरातील कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी पोलिसांना जबाब दिला होता.
यात बिल्डर आणि नेत्यांची नाव असून झिशानने आपल्या जबाबात बिश्नोई गँगचा उल्लेख केला नसल्याचे बोलले जात आहे. पंरतु, झिशान सिद्दीकी यांनी आपल्या जबाबातठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि भाजप नेते मोहित कंबोज यांची नावे घेतल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता मोहित कंबोज यांनी एक निवेदन जारी करुन आपली बाजू स्पष्ट केली आहे.
मोहित कंबोज काय म्हणाले?
माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मोहित कंबोज यांचे नाव समोर आले आहे. त्यांचे नाव समोर आल्यानंतर आता मोहित कंबोज यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “दिवंगत बाबा सिद्दीकी माझे चांगले मित्र होते. मागच्या १५ वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. ते एनडीएचा भाग होते. निवडणुकीसह विविध विषयांवर आम्ही नियमित बोलायचो. ही घटना घडली, त्यावेळी मला धक्का बसला. त्या कठीण प्रसंगात मी त्यांच्या कुटुंबासोबत रुग्णालयात होतो. दुर्देवाने हे आम्हा सर्व मित्रांचं नुकसान झाले आहे. सत्य समोर आलं पाहिजे आणि न्यायाचा विजय झाला पाहिजे” असे मत मोहित कंबोज यांनी व्यक्त केले आहे.
लॉरेन्स बिष्णोई गँगने घेतलीय जबाबदारी…
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने घेतली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत असलेल्या संबंधातून ही हत्या झाल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी काही आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.