आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज सामन्यात शुभमन गिलच्या झंझावाती शतकाच्या जोरावर राजस्थानने दिलेल्या २१५ धावांचे आव्हान गुजरातने सहज पार केले.
राजस्थानची सुरुवात अत्यंत खराब झाली. यशस्वी जयस्वाल केवळ १ धाव करून मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र त्यानंतर वैभव सूर्यवंशीने आक्रमक फलंदाजी करत गुजरातच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याने अवघ्या ४७ चेंडूत ९६ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ७ षटकार ठोकले. शतकाच्या उंबरठ्यावर असताना कागिसो रबाडाने त्याला झेलबाद केले. या खेळीमुळे वैभव सूर्यवंशी आयपीएलच्या एका हंगामात ७०० धावा करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला.
वैभवला रवींद्र जडेजाने चांगली साथ दिली. जडेजाने नाबाद ४५ धावा करत डाव सावरला, तर शेवटच्या षटकांमध्ये डोनोव्हन फरेराने ११ चेंडूत ३८ धावांची वादळी खेळी केली. त्यामुळे राजस्थानने २० षटकांत ६ बाद २१४ धावांचा मोठा डोंगर उभारला. गुजरातकडून कागिसो रबाडाने दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या.
२१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सलामी जोडी सुरुवातीपासूनच आक्रमक दिसली. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी राजस्थानच्या गोलंदाजांना अक्षरशः हैराण केले. दोघांनी पॉवरप्लेमध्येच धावांचा पाऊस पाडत सामना गुजरातच्या बाजूने झुकवला. सुदर्शनने अर्धशतक झळकावत महत्त्वाची साथ दिली, तर गिलने कर्णधाराला साजेशी खेळी करत केवळ ५३ चेंडूत १०४ धावांचे शानदार शतक ठोकले. त्याच्या खेळीत चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली.
गिल बाद झाला तेव्हा गुजरात विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. त्यानंतर जोस बटलर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी संयमी फलंदाजी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. या विजयासह गुजरात टायटन्सने आयपीएल २०२६च्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून आता त्यांची अंतिम लढत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरुद्ध होणार आहे.




