भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल रात्री 80 टक्क्यांवर पोहचला असून अजूनही जोरदार पाऊस सुरू असल्याने आणि पाण्याची जोरदार आवक होत असल्याने आज शुक्रवारी सकाळपर्यंत पाणीसाठा 85 टक्क्यांवर पोहचलेला असेल.
दरम्यान, धो-धो पाऊस कायम राहिल्यास नियमानुसार पाणी नियंत्रणासाठी 10500 दलघफू पाणीसाठा झाल्यानंतर कोणत्याहीक्षणी प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्रीय वार्यांची स्थिती आणि तिथून थेट अरबी समुद्रापर्यंत पसरलेला द्रोणीय पट्टा यामुळे मान्सून अत्यंत सक्रिय झाला आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे कोकणकडा, सह्याद्रीच्या रांगा आणि घाट माथ्यावर आषाढ सरी जोरदार कोसळू लागल्या आहेत. याचमुळे भंडारदरा धरणात जोमाने नवीन पाण्याची आवक होत आहे.
पाणलोटातीलु चेरापुंजी समजल्या जाणार्या घाटघर आणि रतनवाडीत धो-धो पाऊस कोसळत असल्याने डोंगरदर्यांवरील धबधबे आक्राळविक्राळ रूप धारण करीत असून ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे. परिणामी धरणातील पाणीपातळी तासागणिक वाढू लागली आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने तब्बल 690 दलघफू पाणी दाखल झाले. त्यानंतर काल दिवसभरात पुन्हा 661 दलघफू पाणी आले. त्यामुळे सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 8735 दलघफू (79.13टक्के) झाला होता. तो रात्री 80 टक्क्यांच्या पुढे गेला. अजूनही पावसाचा जोर टिकून असल्याने धरणात पाण्याची आवक विक्रमी होत आहे. आज सकाळपर्यंत पाणीसाठा 85 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.
भातखाचरे पाण्याने तुडुंब होत असून निसर्ग सौंदर्याने आणखी फुलला आहे. हे सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटकांची गर्दीही दिवसेंदिवस वाढु लागली आहे. वाकीचा ओव्हरफ्लो 2199 क्युसेकपर्यंत वाढला असून अन्य पाणीही येत असल्याने निळवंडेतही आता आवक वाढली आहे. या धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 3331 दलघफू (39.97 टक्के)वर गेला होता. त्यानंतर काही वेळातच या धरणातील पाणीसाठा 40 टक्क्यांवर गेला होता.
मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर
कोतूळ |वार्ताहर| Kotul
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेती, पाणीयोजना, औद्योगिकीकरणासाठी लाभदायी असलेल्या मुळा धरणाच्या अकोले तालुक्यातील पाणलोटात आषाढसरी जोरदार बरसत असल्याने आता मुळा नदी दुथडी वाहत असून आज विक्रमी आवक होणार आहे. त्यामुळे 26000 दलघफू क्षमतेचे हे धरण आज गुरूवारी रात्री उशीरा अथवा शुक्रवारी निम्मे भरण्याची शक्यता आहे. मंगळवारी रात्री आषाढ सरींनी जोर धरल्याने मुळा नदीतील काल बुधवारी कोतूळ येथील विसर्ग 8028 पर्यंत वाढला तोच मंगळवारी सायंकाळी केवळ 3212 क्युसेक होता. काल दिवसभरातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने या नदीचा विसर्ग सायंकाळी थेट 17243 क्युसेकपर्यंत वाढला. यामुळे धरणाकडे जोमाने पाणी येत असून आज विक्रमी आवक होणार आहे.
या धरणात काल सायंकाळी पाणीसाठा 11318 दलघफू झाला होता. पाण्याची आवक पाहता आज हा पाणीसाठा 12000 दलघफूच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. पाण्याची आवक टिकून राहिल्यास आज-उद्या या धरणातील पाणीसाठा निम्म्याच्या वर जाण्याची शक्यता आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांतील पाऊस-कोतूळ 16, मुळा डॅम 8, खडकी 95, विहीर 31, चार 15, डोळासणे 16.
अनेक जनावरे दगावली
संततधार पाऊस आणि गारठ्यामुळे सातेवाडी, फोफसंडी भागात 35 जनावरे दगावली असल्याची माहिती पुढे आली आहे. ही संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. हरिश्चंद्र गड परिसरातही जनावरांचे हाल होत आहे. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
डिंभे 60 टक्के; वडजमधून पुन्हा पाणी सोडल
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पाणलोटातही प्रमाणात आषाढ सरी जोरदार कोसळत असल्याने दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कुकडी प्रकल्प समूह धरणातील पाणीसाठा 50 टक्क्यांवर गेला असून 13500 दलघफू क्षमतेचे डिंभे धरण 60 टक्के भरले आहे. वडज धरणात पाण्याची आवक वाढल्याने या धरणातूनही पाणी सोडण्यात येत आहे. घोड धरणही तुडूंब झाले आहे. पाण्याची आवक वाढतच असल्याने वडज धरणातील पाणीसाठा 86 टक्के स्थिर ठेऊन या धरणातून पहाटे सांडव्यातून 2500 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यानंतर तो 3000 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे.
मायनसमध्ये असलेल्या पिंपळगाव जोगे धरणातील पाणीसाठा 13 टक्क्यांवर गेला आहे. विसापूरही ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहे. या धरणातील पाणीसाठा 92 टक्के आहे. घोड धरणही भरले असून या धरणातील पाणीसाठा 5959 दलघफू (99.60 टक्के) आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 896 दलघफू पाणी दाखल झाल्याने उपयुक्त पाणीसाठा 14133 झाला होता. गतवर्षी या काळात 53 टक्के पाणीसाठा झाला.




