Friday, May 3, 2024
Homeअग्रलेखतरुणाईच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ आहे कोणाला ?

तरुणाईच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ आहे कोणाला ?

‘कोणत्याही आव्हानांचा सामना करण्याची ताकद खेळ देतो. खेळामुळे शारीरिक व मानसिक विकास उत्तम होत असतो. तथापि तरुणाई तासन्तास मोबाइलवरच वेळ घालवते…

तरुणाईने मोबाईलवर नव्हे तर मैदानावर वेळ घालवावा’ असे मत रोइंगपटू व अर्जुन पुरस्कार विजेता दत्तू भोकनळ यांनी व्यक्त केले. चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही हे दत्तू भोकनळ यांचे गाव. मोलमजुरी ते ऑलिम्पिक खेळाडू इथपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षाचा आणि तितकाच रोमांचक आहे.

- Advertisement -

आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. भोकनळ यांचे अनुभवाचे बोल आहेत. तरुणाईच्या आयुष्याला आकार देण्यातले खेळाचे महत्त्व ते स्वतः अनुभवत आहेत.

त्यांचा सल्ला जरुर विचारात घेतला जायला हवा. तथापि, तेवढी फुरसत तरुणाईकडे आहे का? त्यांना फुरसत आणि विचार करण्यासाठी वेळ मिळू दिला जातो का? तरुणाईचा वेळ फक्त समाजमाध्यमांवर आणि ऑनलाइन गेम खेळण्यातच का जातो? सध्याच्या राजकारणानेही तरुणाईला भुरळ घातली आहे. अशी भुरळ सहज पडेल या रीतीने त्यांची दिशाभूल करण्याचे काम माध्यमे जोमाने करत आहेत. भाषणांच्या व प्रसंगांच्या छोट्या छोट्या क्लिप्स अचानक कशा व्हायरल होतात? निरर्थक मुद्यांवर माध्यमे चर्चा का घडवतात? की त्यांना त्यासाठी कोणी बाध्य करते? कोरोना हा सध्याचा सगळ्या व्यासपीठांना पुरून उरणारा विषय ठरत आहे की ठरवला जात आहे? कोरोना जगात वाढला त्यापेक्षा जास्त वेगाने आता भारतात वाढत आहे, असे आकडेवारीने रोज जनतेच्या मनावर माध्यमांकडून ठसवले जात आहे. त्याचा नेमका हेतू काय असावा? देश चार महिने बंद ठेऊन काय साध्य झाले?

तरुणांमध्ये मोबाइलचे व्यसन वाढत आहे. तरुण मुले मोबाइलवर किती तास वाया घालवतात? कोणत्या साईट पाहातात? गेम किती वेळ खेळतात? या मुद्यांवर सतत सर्वेक्षणे होत असतात आणि त्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध होत असतात. त्यातील बहुतेक निष्कर्ष नकारात्मकच असतात. पण ते चर्चेला घ्यावे, असे मात्र कोणालाही का वाटू नये? बैठ्या जीवनशैलीमुळे अनेक दुर्धर व्याधींचा विळखा तरुणाईला पडत आहे. अपुर्‍या आरोग्य यंत्रणेवर अकारण कामाचा ताण वाढत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी काहीच प्रयत्न का होत नाहीत? की हा प्रश्नच नेत्यांना महत्वाचा वाटत नाही?

सरकारांची पाडापाडी करण्यातच जास्त रस का घेतला जातो? तरुणाईचे प्रश्न फक्त अधूनमधून फक्त तोंडी का लावली जातात? भारत हा तरुणांचा देश आहे. याच तरुणाईच्या बळावर देशाने महासत्ता होण्याचे स्वप्न जनतेला दाखवले जात आहे. हे मात्र पुनःपुन्हा बजावले जाते. पण तरुणाई मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्त नसेल तर हे स्वप्न प्रत्यक्षात कसे उतरणार? तरुणाईच्या मूलभूत प्रश्नांकडे अधिक लक्ष देऊन उपाययोजना करण्याची जास्त गरज आहे. एक विधायक उपाय भोकनळ यांनी सुचवला आहे. तथापि, त्यासाठी मैदाने कोठून आणणार आणि त्यांची अपुरी संख्या कोण वाढवणार? हा खरा प्रश्न लक्षात घ्यायला राजकारणमग्न नेत्यांकडे वेळ कोठून असणार?

- Advertisment -

ताज्या बातम्या