खैरी निमगाव |वार्ताहर| Khairi Nimgaon
श्रीक्षेत्र धनगरवाडी येथे सद्गुरू योगीराज श्री गंगागिरी महाराज 179व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त सुरू असलेल्या श्री गंगागिरी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात साडेपाच फूट लांबीचा ग्रीन इगुआना नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. वैशिष्ट्यपूर्ण शरीररचना, मोठा आकार आणि पाठीवरील काटेरी शल्कांमुळे हा परदेशी सरडा पाहण्यासाठी लहान मुलांसह नागरिकांची उत्सुकता वाढली आहे.
ग्रीन इगुआना हा मध्य व दक्षिण अमेरिकेतील उष्णकटिबंधीय भागात आढळणारा, प्रामुख्याने शाकाहारी सरडा आहे. पाने, फुले, फळे व विविध वनस्पती त्याच्या आहाराचा भाग आहेत. मोठे डोके, गळ्याखालील त्वचेचा पडदा, पाठीवर असलेली काटेरी शल्कांची रांग, मजबूत पाय आणि लांब शेपटी ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. शेपटीसह त्याची लांबी सुमारे दोन मीटरपर्यंत पोहोचू शकते. प्रदर्शनात या ग्रीन इगुआनासोबत छायाचित्रे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून, त्याच्याविषयीची माहिती जाणून घेण्याची उत्सुकताही दिसून येत आहे. सप्ताहस्थळी लावण्यात आलेला ग्रीन इगुआनाचा आकर्षक फ्लेक्सही भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
दि. 18 ते 25 ऑगस्टदरम्यान सुरू असलेल्या या कृषी प्रदर्शनात आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी साहित्य, अवजारे आणि विविध उपक्रमांची माहिती शेतकरी व नागरिकांना दिली जात आहे. या सर्वांमध्ये साडेपाच फुटांचा ग्रीन इगुआना हे प्रदर्शनातील आगळे-वेगळे आकर्षण ठरले आहे.
वयानुसार बदलतो शरीराचा रंग
लहान वयात ग्रीन इगुआना प्रामुख्याने हिरव्या रंगाचा दिसतो. वय वाढल्यानंतर त्याच्या शरीराचा रंग हिरवा, करडा, तपकिरी किंवा मिश्र छटांमध्ये बदलू शकतो. प्रौढ ग्रीन इगुआनाचे वजन साधारणतः 7 ते 9 किलो असते.




