लोणी |वार्ताहर| Loni
कृषी व्यवस्थेत काळानुरूप होणारे बदल स्विकारल्या शिवाय आता पर्याय नाही. आधुनिक तंत्रज्ञान आणि जैविक खतांचा योग्य उपयोग करुन उत्पादन क्षमता वाढविण्याचे आव्हान यापुढे स्विकारावे लागणार आहे. सेंद्रीय शेती करिता केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण उपयुक्त ठरणार असून निर्यातक्षम उत्पादन निर्माण करण्यासाठी आता कृषी क्षेत्रात काम करणार्या संस्थांनी सुध्दा मार्गदर्शन करण्याची भूमिका एकत्रितपणे बजावावी, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
डाळींब रत्न बाबासाहेब गोरे यांच्या पुढाकाराने अहिल्यानगर, पुणे, नाशिक जिल्ह्यातील डाळींब उत्पादक शेतकर्यांसाठी आयोजित केलेल्या डाळींब बहार मेळावा तसेच कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन ना. विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. महंत उध्दव महाराज मंडलिक, जिल्हा अधिक्षक कृषी आधिकारी सुधाकर बोराळे, बाजार समितीचे उपसभापती आण्णासाहेब कडू, महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाचे सदस्य ऋषिकेश खांदे, तालुका कृषी आधिकारी आबासाहेब भोरे, सतीश बावके, संदीप निर्मळ, सचिन चिंधे, हर्षल खांदे यांच्यासह डाळींब उत्पादक शेतकरी उपस्थित होते. ना.विखे पाटील म्हणाले, कृषी क्षेत्रामध्ये नैसर्गिक आणि मानव निर्मित आव्हानं निर्माण होत असले तरी यावर मात करुन तरुण शेतकरी प्रयोगशिल शेती निर्माण करीत आहेत.
या शेतकर्यांना बाबासाहेब गोरे यांच्याकडून मिळणारे मार्गदर्शन हे उपयुक्त ठरत असून जे कृषी विद्यापीठांना जमले नाही ते गोरे यांनी आपल्या संशोधन संस्थेतून करुन दाखविले. त्यांच्या नवनवीन संकल्पनांमुळे डाळींबासह सोयाबीनचे उत्पादनही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या आर्थिक विकासाला कृषी क्षेत्राचा वाटा महत्वपूर्ण असल्याने केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगून ना. विखे पाटील म्हणाले, नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पातही कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने नेहमीच प्रक्रिया उद्योग आणि कृषी क्षेत्रातील स्टार्टअपला प्रोत्साहन दिले असून कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करतानाच सेंद्रीय शेतीलाही आपल्याला पुढे घेवून जावे लागेल.
जैविक खतांच्या मात्रांमुळेच आज उत्पादनाची क्षमता वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निसर्गाचे आव्हान आपल्यासमोर आहेतच. यासाठी राज्य सरकारने हवामानावर आधारित पीकविमा योजना फळांसाठी सुध्दा लागू केली असून याचा मोठा लाभ हा डाळींब उत्पादक शेतकर्यांनाही झाला आहे. राज्य सरकार कोणतीही योजना बंद करणार नाही. लाडक्या बहिणीं प्रमाणेच तुम्हालाही विमा योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उध्दव महाराज मंडलिक, बाबासाहेब गोरे यांचीही भाषणे झाले. मंत्री विखे पाटील यांच्यासह मान्यवरांनी प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेल्या कृषी औजारे आणि साहित्यांच्या स्टॉलला भेट दिली.