नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवार (दि.०४) रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपला (BJP) पश्चिम बंगाल, आसाम आणि पद्दुचेरीमध्ये घवघवीत यश मिळाले. त्यानंतर काल (दि.८) रोजी कोलकाता (Kolkata) येथे पार पडलेल्या भाजप आमदारांच्या (MLA) बैठकीत सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांची एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाजप प्रदेशाध्यक्ष सुमित भट्टाचार्य यांनी मांडलेल्या प्रस्तावाला सर्व आमदारांनी (MLA) पाठिंबा दिल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांची गटनेतेपदी निवड झाली. त्यानंतर आज (शनिवारी)सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित आहेत. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री (CM) हजर आहेत. कोलकाता येथील गांधी मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडत आहे.
भाजपने बंगालमध्ये राबवला ‘हिमंता बिस्वा सरमा’ पॅटर्न
५५ वर्षांचे सुवेंदू अधिकारी एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, त्यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत त्यांनी चक्क ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम आणि भवानीपूर मतदारसंघातून पराभव करत जायंट किलर ठरले. भाजपने बंगालमध्येही आसामचा यशस्वी हिमंता बिस्वा सरमा पॅटर्न राबवल्याचे दिसत आहे. आसाममध्ये २०१५ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या हिमंता बिस्वा सरमा यांनी पक्षवाढीसाठी मोठी भूमिका बजावली. २०२१ मध्ये पक्षाने त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली. बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांनीही तृणमूल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि पक्षाला २९३ पैकी २०७ जागा जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला.




