पुणे (प्रतिनिधी) / Pune – गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने सगळे जग ठप्प झाले आहे. आपल्या शेतकरी बांधवांनी या संकटातही राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला, कृषी क्षेत्राने राज्याची अर्थव्यवस्था सावरली असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काढले.
पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या कृषिभूषण डॉ.आप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी, शरद आदर्श कृषिग्राम पुरस्कार व आदर्श गोपालक पुरस्काराचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सन 2019-20 व 2020-21 या दोन वर्षातील 6 शेतकरी व 9 आदर्श गोपालक असे एकूण 15 शेतकऱ्यांना या पुरस्काराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 21 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे कृषिभूषण डॉ. आप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी व शरद आदर्श कृषिग्राम पुरस्काराचे स्वरूप आहे.
अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरु केलेला शेतीचा वारसा शेतकरी बांधव पुढे नेत आहेत. कोणत्याही क्षेत्रात काम करताना पुरस्कार दिल्याने काम करणाऱ्याला हुरूप येतो. कृषी क्षेत्रातील डॉ. आप्पासाहेब पवार आणि राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे योगदान मोलाचे आहे. कृषी क्षेत्रात निष्ठेने काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करताना मला आनंद होत आहे.
शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला दिली पाहिजे. आधुनिक पद्धतीने शेती करुन शेतीचे उत्पादन वाढविले पाहिजे, याच उद्देशाने दरवर्षी बारामतीला कृषी प्रदर्शन भरवले जाते. ‘विकेल ते पिकेल’ ही योजना कृषी विभाग राबवित आहे. विक्रमी पीक घेऊन नफ्यात शेती कशी करायची हे शेतकऱ्याने शिकले पाहिजे. ऊसाची पाचट पेटवून देऊ नका, त्याऐवजी ते शेतात गाडा, त्यामुळे शेतीचा पोत सुधारतो, असेही ते म्हणाले.
अजित पवार पुढे म्हणाले, शेतकरी बांधवांना न्याय देणारे, सर्वांना विकासाच्या वाटेवर घेऊन चालणारे हे सरकार असून कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने दिले जाते. शेतकरी वर्गाच्या कष्टाचे चीज झाले पाहिजे. यावर्षी धरणांची परिस्थिती समाधानकारक नाही. सध्या धरणे 30 टक्के भरलेली आहेत. परंतु पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने केले जाईल, असे सांगून कोरोनाविषयक नियम पाळण्याचे सर्वांना आवाहन केले.
सर्वांनी मास्क लावण्याची सवय लावून घेतली पाहिजे. शेतकऱ्यांच्या सोईसाठी फिरते पशुचिकित्सालय सुरु केले आहेत. त्यासाठी आणखी 30 ॲम्ब्युलन्स खरेदी करणार असून त्यासाठी 162 क्रमांक निश्चित करण्यात आला आहे. देशी गाईच्या दुधाला, तुपाला, शेणाला, गोमूत्राला महत्त्व आहे, असेही ते म्हणाले. कोरोनाच्या संकटामुळे अद्याप पीककर्ज थोडे बाकी आहे, परंतु योग्य ती सर्व मदत शेतकऱ्यांना केली जाईल. त्यांच्या फायदाचे निर्णय घेतले जातील. या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या फायद्याचे काही बदल असल्यास ते सुचवावेत, त्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते पुढे म्हणाले.