Tuesday, March 25, 2025
HomeनगरAhilyanagar Assembly Election Result : नगरमधून संग्राम जगताप यांची 'हॅटट्रिक'

Ahilyanagar Assembly Election Result : नगरमधून संग्राम जगताप यांची ‘हॅटट्रिक’

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

अहिल्यानगरकरांनी पुन्हा एकदा विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्यावर विश्वास दाखवित ‘विश्वास जुना… संग्रामभय्या पुन्हा’ ही त्यांची टॅग लाईन सार्थ ठरवली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांचा 39 हजार 618 मतांनी पराभव करत विजयाची हॅटट्रीक केली. संग्राम जगताप यांना 1 लाख 18 हजार 636 तर अभिषेक कळमकर यांना 79 हजार 18 मते मिळाली. संग्राम जगताप यांनी जाहीर सभा न घेता ‘होम टू होम’ प्रचार केला आणि अहमदनगर शहर मतदार संघात विजयाची हॅटट्रीक करणारे दुसरे उमेदवार ठरले. याआधी स्व. अनिल राठोड यांनी पाचवेळा विजय मिळवला आहे.

- Advertisement -

अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शनिवारी नागापूर एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात झाली. पहिल्या फेरीपासून आ. जगताप यांनी मतांची आघाडी घेतली होती. मात्र, मध्ये सातवी, आठवी व नवव्या फेरीत तसेच चौदाव्या फेरीत त्यांची आघाडी थोडी कमी झाली. पण या चार फेर्‍यांत कळमकरांना मिळालेली मते आ. जगतापांनी आधी घेतलेली सुमारे 20 हजारांची आघाडी तोडण्यास कमी पडली. त्यानंतर नवव्या फेरीपासून आ. जगतापांनी पुन्हा आघाडी घेण्यास केलेली सुरूवात शेवटपर्यंत कायम राहिली व एका दणदणीत विजयाची नोंद त्यांनी केली. मतमोजणीच्या सर्व फेर्‍या संपल्यावर आ. जगताप यांना एकूण 1 लाख 18 हजार 636 तर कळमकर यांना 79 हजार 18 मते मिळाली. 39 हजार 618 मताधिक्याने संग्राम जगताप यांनी अभिषेक कळमकर यांचा दणदणीत पराभव केला. मात्र, संग्राम जगताप यांचा गेल्या तीन निवडणुकांतील मताधिक्क्याचा आलेख चढताच राहिला.

2014 मध्ये सुमारे 3 हजार मतांनी, 2019 मध्ये 11 हजार मतांनी व आता 2024 मध्ये 39 हजार 650 मतांचे मताधिक्य घेऊन त्यांनी बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या फायद्याचा ठरला. त्यांनी गेल्या दीड ते दोन वर्षात अहिल्यानगर शहरात विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त करून विकासकामे सुरू केली. उड्डाणपुलाचे काम, शहर व उपनगरातील विविध रस्त्यांची कामे सुरू झाली. विकास कामांच्या जोरावर त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. विकासकामांवर त्यांनी लोकांकडे मते मागितली. याउलट गेल्या 35 वर्षांपासून नगर शहर मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला होता.

पण, यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात नगर शहर मतदार संघ शिवसेना ऐवजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सुटला. त्यात उमेदवार आणि जागा वाटपाचा घोळ जगताप यांच्या पथ्यावर पडला. जगताप यांनी प्रचाराचे काटेकोर नियोजन करून केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचविली. सुरू असलेल्या विकासकामांवर अहिल्यानगरकरांनी विश्वास दाखवित पुन्हा एकदा जगताप यांना विजयी केले आहे. दरम्यान, संग्राम जगताप यांची विजयाकडे वाटचाल सुरू होताच त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी सुरू केली. रामराव चव्हाण शाळेच्या मैदानावर गुलालाची मुक्त उधळण करीत महिलांसह युवकांनी आनंदोत्सव साजरा केला.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चिन्ह घड्याळ व भगवे झेंडे फडकावत युवकांनी रॅली काढली. ‘विश्वास जुना..संग्राम भैय्या पुन्हा…’ अशा घोषणाही दुमदुमल्या. महिलांची संख्या लक्षणीय होती. आ. जगताप यांचे मताधिक्य जसे वाढत होते, तसा जल्लोष वाढत होता व गर्दीही वाढत होती. ‘डब्बे मे डब्बा…डब्बे मे केक….संग्रामभैय्या हजारों मे एक…’ ‘कांच की कटोरी मे ईलायची का चुरा…संग्रामभय्या नगर का हिरा…’ अशा जोरदार घोषणा नगरच्या लाडक्या बहिणींनी देऊन आ. संग्राम जगताप यांच्या विजयाचा जल्लोष केला. आ. जगताप यांनी आपल्या समर्थकांसह नगर शहरात ठिकठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...