अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवा सुलभ आणि मोफत करण्यासाठी आयुष्मान कार्ड निर्मितीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील 10 लाख 55 हजार कुटुंबांपैकी तब्बल 41 लाख 65 हजार लाभार्थी पात्र ठरले असून, यापैकी 18 लाख 23 हजार नागरिकांनी आतापर्यंत आपले आयुष्मान कार्ड तयार केले आहे. उर्वरित पात्र नागरिकांनी ही संधी गमावू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले आहे.
जिल्ह्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एबी- पीएमजेएवाय) आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (एमजेपीजेएवाय) यांची संयुक्त अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबास 5 लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. तसेच 1 हजार 356 प्रकारच्या शस्त्रक्रिया व विशेष उपचार योजनेंतर्गत समाविष्ट आहे. 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत वय वंदना कार्ड व्दारे अतिरिक्त 5 लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार केले जात आहे.
31 ऑगस्ट 2025 पर्यंत चालणार्या या विशेष मोहिमेत जिल्हा प्रशासनाने सर्व अधिकारी व कर्मचार्यांना सक्रीय सहभागाची सूचना केली आहे. तालुका आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व सरपंच यांनी नागरिकांपर्यंत ही मोहीम पोहोचवावी. दररोजच्या प्रगतीवर जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी लक्ष ठेवणार आहेत.
कार्ड काढण्यासाठी प्रक्रिया सोपी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील सदस्याकडे आयुष्मान गोल्डन कार्ड असणे आवश्यक आहे. हे कार्ड नागरिकांना आशा स्वयंसेविका, आपले सरकार सेवा केंद्र, स्वस्त धान्य दुकानदार (राशन दुकाने), तसेच गूगल प्ले स्टोअरवरील आयुष्मान अॅप यांच्या माध्यमातून सहज उपलब्ध आहे. ऑनलाइन कार्ड काढण्यासाठी पोर्टलवर भेट द्यावी किंवा मोबाईलवर आयुष्मान अॅप डाउनलोड करावे. नोंदणीसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड आणि लाभार्थ्याचा मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. ओटीपीव्दाारे माहिती भरून अर्ज सादर केल्यानंतर कार्ड त्वरित डाउनलोड करता येते.
जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याने आपले आयुष्मान कार्ड 31 ऑगस्टपूर्वी करून घ्यावे, जेणेकरून कोणत्याही आजाराच्या वेळी मोफत व दर्जेदार उपचारांचा लाभ घेता येईल.
– आनंद भंडारी, सीईओ, जिल्हा परिषद.





