Monday, February 16, 2026
Homeक्राईमAhilyanagar : अहिल्यानगरात एटीएसचे छापे

Ahilyanagar : अहिल्यानगरात एटीएसचे छापे

मुकुंदनगर, सावेडी, कोठला भागात 12 ठिकाणी कारवाई, शस्त्रसाठाही जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील मुकुंदनगर, सावेडी उपनगरातील तपोवन रस्ता परिसर व कोठला भागात रविवारी (15 फेब्रुवारी) पहाटेपासून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुप्त छापेमारी मोहीम राबवून 12 घरांची झडती घेतली. सुमारे 100 ते 125 अधिकारी-कर्मचार्‍यांच्या पथकाने एकाच वेळी विविध ठिकाणी कारवाई करत लॅपटॉप, मोबाईलमधील डिजिटल डेटा, संशयास्पद पुस्तके व कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

ही कारवाई अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती. पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास विविध वाहनांतून पथक शहरात दाखल झाले. स्थानिक पोलिसांना केवळ बंदोबस्तासाठी कळविण्यात आले होते; तपासाच्या स्वरूपाची माहिती त्यांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे कारवाईदरम्यान संबंधित परिसरात तणावपूर्ण शांतता आणि उत्सुकता निर्माण झाली होती. पहाटे तीनपासून सुरू झालेली तपासणी दुपारी तीनपर्यंत सुरू होती. मुकुंदनगरमधील 10, तपोवन रस्ता परिसरातील एक आणि कोठला भागातील एका घरात सखोल चौकशी करण्यात आली. डिजिटल उपकरणांमधील डेटा जप्त करून त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

YouTube video player

कोणालाही ताब्यात घेण्यात आले नसले तरी काही तरूणांकडे कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. कारवाईदरम्यान पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, स्वतः कार्यालयात हजर झाले होते. त्यांनी आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्त देण्याच्या सूचना केल्या. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी तसेच भिंगार कॅम्पचे सहायक निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी संबंधित भागात उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवले. तथापि, एटीएसच्या अंतर्गत तपासात स्थानिक पोलिसांना सहभागी करून घेण्यात आले नव्हते. त्यांच्या भूमिकेपुरते बंदोबस्त आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम मर्यादित ठेवण्यात आले.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत काही धागेदोरे हाती लागले असून त्यावर आधारित पुढील टप्प्यात व्यापक कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर एटीएसची कारवाई झाल्याने शहरात दिवसभर चर्चांना उधाण आले होते.

डेटाचे तांत्रिक विश्लेषण निर्णायक ठरणार
घरातून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉप, मोबाईल व अन्य डिजिटल उपकरणांतील डेटा एटीएसकडून ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या डेटाचे सखोल तांत्रिक विश्लेषण करण्यात येणार असल्याचे समजते. त्यातून संशयास्पद व्यवहार, संपर्क किंवा डिजिटल नेटवर्क समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घरात आढळले शस्त्र; दोन गुन्हे दाखल
मुकुंदनगर परिसरातील दोन घरांवर कारवाईदरम्यान मोठा शस्त्रसाठा आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमीर हमजा जफर शेख, असद जुबेर सय्यद यांच्या घरातून दोन तलवारी, एक गुप्ती, एक फायटर, दोन चाकू, एक कोयता, एक एअरगन व 99 छरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील अमीर शेखला ताब्यात घेतले आहे. तर, अयान अन्वर शेख (वय 25) याच्या घरात सहा कोयते मिळून आले. या प्रकरणी भिंगार पोलिसात भारतीय हत्यार अधिनियमांतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहे. पुढील तपास सुरू असून शस्त्रसाठ्याचा संभाव्य वापर व त्यामागील हेतू याचा शोध घेतला जात आहे.

कट्टरवादी संपर्कांच्या पार्श्वभूमीवर कारवाई
सूत्रांच्या माहितीनुसार, काही तरूणांना कट्टरवादी विचारसरणीच्या संघटनांशी जोडण्याचा प्रयत्न होत असल्याची गुप्त माहिती एटीएसकडे होती. त्यानुसार अहिल्यानगरसह मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली येथील एटीएस विभागांचे अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते. अहिल्यानगरमध्ये एटीएसची ही व्यापक आणि बहुआयामी कारवाई अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. कट्टरवादी विचारसरणीच्या प्रभावाखाली तरूणांना सक्रिय करण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता लक्षात घेता, सोशल मीडियाच्या माध्यमांतून वाढणार्‍या संपर्क जाळ्यांवरही यंत्रणांचे बारकाईने लक्ष असल्याचे या कारवाईतून स्पष्ट होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सरकारी घरकुलांवर देखील आता सोलरचा लखलखाट

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्य सरकारने ग्रामीण भागातील गरजू आणि बेघर कुटुंबांना पक्के घर देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा-2 ला मंजुरी दिली आहे. आता या...