अहिल्यानगर | क्राईम डायरी | सचिन दसपुते
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात घडलेल्या सहा गोळीबाराच्या घटनांनी कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू तर चौघे जखमी झाले असून बहुतांश घटना टोळीयुध्द, राजकीय वैमनस्य आणि ठेक्यांच्या वादातून घडल्या आहेत. गावठी कट्ट्यांचा सर्रास वापर होत असल्याने पोलिसांच्या गुप्त माहिती यंत्रणेवर आणि प्रतिबंधात्मक कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. गावठी कट्टे, टोळीयुध्द, राजकीय वाद आणि पोलीस दलातील शिस्तभंगाच्या घटना यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. किरकोळ वादातून थेट गोळीबार होण्याची प्रवृत्ती वाढत आहे. प्रतिबंधात्मक कारवाई, शस्त्र जप्ती मोहीम आणि गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई न झाल्यास परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे. पोलीस दलातील काही अधिकारी, कर्मचार्यांकडून खाकीला डाग लावणारा गंभीर प्रकार घडला असून, यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे.
श्रीरामपूर येथे भरदिवसा बंटी जाहगिरदार याची दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. राजकीय वैमनस्य आणि दीर्घकाळापासून सुरू असलेल्या टोळीयुध्दातून हा खून झाल्याचे समोर आले. श्रीरामपूरमधील टोळीयुध्दामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाणे हद्दीत गोळीबारांच्या लागोपाठ घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चांदा येथे कंदूरी पार्टीदरम्यान किरकोळ बाचाबाचीचे रूपांतर थेट गोळीबारात झाले. गावठी कट्टा सहज उपलब्ध होत असल्याने एका तरूणाचा मृत्यू झाला. घोडेगाव येथे फुलमाळी व शिरसाठ गटांमधील जुन्या वादातून नितीन शिरसाठ याचा गोळीबारात मृत्यू झाला.
ठेक्यांच्या वादातून उफाळलेल्या संघर्षाने पुन्हा एकदा टोळीयुध्दाचा भडका उडविला. अंमळनेर परिसरातही एका युवकावर गोळीबार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. यावरून नेवासा तालुक्यात बेकायदेशीर शस्त्रांची उपलब्धता किती सहज आहे, याची कल्पना येते. तसेच सुपा (ता. पारनेर) येथे व्यावसायिकावर गोळीबार करून खूनाचा प्रयत्न करण्यात आला. अहिल्यानगर शहरातील कोठला भागात महानगरपालिका निवडणुकीतील वादातून गुन्हा मागे घेण्यासाठी तरूणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. महानगरपालिका निवडणुकीपासून दोन गटांतील हा संघर्ष सुरू झाला आहे.
जिल्ह्यात गावठी कट्टे सहज उपलब्ध होत असल्याचे या घटनांवरून दिसून येते. मध्यंतरी जिल्हाभर राबविलेल्या विशेष मोहिमेत केवळ एक कट्टा जप्त झाल्याची माहिती आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात फायरिंग होत असताना जप्तीची आकडेवारी नगण्य असल्याने स्थानिक पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईवर संशय निर्माण होत आहे. कट्ट्यांची खरेदी-विक्री साखळी उघड करण्यासाठी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यासाठी गुप्त माहिती संकलन, सातत्यपूर्ण धाडी आणि प्रतिबंधात्मक कारवाई मोहिमा अपेक्षित असताना त्यात ढिलाई झाल्याचे चित्र आहे. किरकोळ वादातून थेट गोळीबार होण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे. व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई, गुन्हेगार टोळ्यांवर कठोर कारवाई, शस्त्र जप्ती मोहीम आवश्यक आहे.
पोलिसांची वादग्रस्त प्रकरणे; प्रतिमेला तडा
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्हा पोलीस दलातील काही गंभीर प्रकार उघडकीस आले. यामुळे पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेला आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी) कर्मचारी शामसुंदर गुजर याने जप्त मुद्देमालातील ड्रग्ज विक्री केल्याचा आरोप सिध्द होऊन त्याला बडतर्फ करण्यात आले. या घटनेने राज्यपातळीवर पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली. पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी दीपक सरोदे याच्यावर महिला पोलीस कर्मचार्याची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला; मात्र निलंबनाची कारवाई न झाल्याने दलात दुजाभावाच्या चर्चांना उधाण आले. त्याच्यावर कारवाई झाली नाही तर त्याची हिंमत आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अरणगाव (ता. अहिल्यानगर) येथील खूनप्रकरण दडपल्याचा आरोप प्रभारी अधिकारी सहायक निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्यावर असूनही ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. वर्षभर गुन्हा दडपून ठेवला, शेवटी दुसर्या अधिकार्याने केलेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला. गंभीर प्रकार उघडकीस येऊन देखील तपासी अधिकार्यांवर कारवाई होत नसेल तर कोणाचा तरी दबाव आहे, अशी चर्चा सुरू आहे. सोनई येथील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याने सहायक निरीक्षक विजय माळी यांना निलंबित करण्यात आले आहे. लोणी पोलीस ठाण्यातील कर्मचारी जोसेफ साळवी याच्यावर अवैध कत्तलखान्यांशी आर्थिक हितसंबंध असल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली.




