
अहिल्यानगर (प्रतिनिधी)
पिक योजनेच्या निकषात झालेल्या बदलामुळे आणि सुधारित पिक विमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्तीची अट वगळण्यात आल्याने २०२५-२६ मधील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही आणि मिळणार नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. सुधारित पिक विमा योजनाही पिक कापणी प्रयोग आणि उंबरठा उत्पादन यावर आधारीत असल्याने गेल्या वर्षीच्या कपाशी उत्पादक शेतकरी आता कपाशी पिक विम्याला मुकले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात २०२४ पर्यंत प्रधानमंत्री पिक विमा राबवण्यात येत होती. या पिक विमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्तीची अट होती. नैसर्गिक आपत्ती झाल्यानंतर पंचनाम्याच्या सूचना आल्यानंतर महसूल आणि कृषी विभागाकडून करण्यात येणाऱ्या पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांना अतिवृष्टीग्रस्त कपाशी पिकाची भरपाई देण्यात येत होती. मात्र, २०२५ च्या सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजनेत बदल करण्यात आला तसेच पूर्वीच्या विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्तीची अट वगळण्यात आल्याने २०२५-२६ मधील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही.
आता शेतकऱ्यांना उत्पादन आधारीत पिक विमा लागू करण्यात आलेला असून यात पिक कापणीसह तांत्रिक बाबींवर आधारीत पिक विमा देण्यात येत आहे. यानुसार सोयाबीन, कापूस आणि भात पिकाला विमा देण्यात येत आहे. जिल्ह्यात पूर्वी एक रुपयात पिक विमा उतरवण्यात येत होता. जिल्ह्यात कपाशी पिकाचे क्षेत्र मोठे होते. २०२४-२५ मध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विमा मंजूर झाला होता. मात्र, त्यानंतर पिक विमा योजनेत बदल केल्याने गेल्य वर्षीच्या एकाही कपाशी उत्पादक शेतकऱ्याला विमा मोबदला मिळालेला नाही. विशेष म्हणजे गेल्या वर्षी किती शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचा विमा उतरवला याचा तपशील कृषी विभागाकडे उपलब्ध झाला नाही.
दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकरी गेल्या वर्षीच्या अतिवृष्टी बाधित कपाशी पिकाच्या भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, नवीन पिक विमा योजनेच्या निषकांचा फटका शेतकऱ्यांना बसल्याने गेल्या वर्षीच्या कपाशी पिकाची भरपाई विसरला असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सात वर्षांपैकी बेस्ट फाईव्ह म्हणजे उंबरठा आधारीत
गेल्या सात वर्षात झालेल्या पिकांच्या उत्पादनापैकी बेस्ट फाईव्ह (पाच वर्षात) झालेल्या उत्पादनावर आधारित उत्पादन म्हणजे उंबरठा आधारीत उत्पादन असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
… तरच भरपाईसाठी पात्र
हंगामातील पिकांचे तांत्रिक उत्पादन आणि पिक कापणी प्रयोग यातील ५० टक्के उत्पादनापेक्षा जादा उत्पन्न असे एकत्र करून जे उत्पादन उंबरठा आधारीत उत्पादनापेक्षा अधिक आहे, अशा कोणत्याच पिकांना पिक विमा मिळणार नाही. तर कमी उत्पादन असणाऱ्या पिकांना पिक विमा मंजूर करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
उपगृह छायाचित्रातून तांत्रिक उत्पादनाचा अंदाज
राज्यात पिकांचा उपगृहातून काढण्यात येणाऱ्या छायाचित्रातून काढण्यात अंदाजानुसार प्रत्येक जिल्ह्यात पिकांचा तांत्रिक अंदाज बांधण्यात येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.




