Sunday, September 6, 2026
HomeनाशिकNashik News : आश्रमशाळा विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे; धरणे आंदोलन मात्र सुरूच

Nashik News : आश्रमशाळा विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे; धरणे आंदोलन मात्र सुरूच

आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत उलगुलान महामोर्चाची घोषणा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना (Student) मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण शुक्रवारी (दि. ४) अखेर मागे घेण्यात आले. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याने विद्यार्थी कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, उपोषण मागे घेतले असले तरी मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लवकरच मुंबईत (Mumbai) उलगुलान महामोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली.

आदिवासी वसतिगृहांमधील असुविधा दूर करणे, सेंट्रल किचनचा निर्णय रद्द करणे, डोनेशनच्या नावाखाली आदिवासी विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लूट थांबविणे, तसेच गेल्या दोन वर्षांत वसतिगृहातील ५९३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या आरोपाची चौकशी करणे, या मागण्यांसाठी आदिवासी विकास विभागाचे मंत्री प्रा. अशोक उईके (Minister Ashok Uike) यांचा राजीनामा घ्यावा, विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि आयुक्त लीना बनसोड यांना हटवावे, या मागण्यांसाठी राहुल पावरा, लक्ष्मी जाधव आणि विवेक गावित यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलनही सुरू होते. आंदोलन मागे घेण्यासाठी आदिवासी आयुक्तालयाकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. उलट आंदोलनाला विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत गेला.

शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आंदोलनकर्त्यांनी मंगळवारी (दि. १) उलगुलान महामोर्चा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यापाठोपाठ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही आंदोलनस्थळी भेट देत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडीची ताकद आंदोलनामागे उभी करून देशातील सर्वांत मोठे आदिवासी आंदोलन उभारण्याची घोषणा त्यांनी केली होती. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके (Abhijeet Dipke) यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडून आंदोलन अधिक व्यापक करावे, अशी भूमिका मांडली होती.

दरम्यान, १३ दिवसांच्या उपोषणादरम्यान राहुल पावरा यांची तीन वेळा प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना अन्नसेवन करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शुक्रवारी विद्यार्थी कृती समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करून उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीतही या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सायंकाळी सातच्या सुमारास राहुल पावरा, विवेक गावित आणि लक्ष्मी जाधव यांनी लहान मुलांच्या हस्ते लिंबूपाणी स्वीकारून उपोषण सोडले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, नाशिक प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत आणि माजी आमदार जे. पी. गावित उपस्थित होते.

मुंबईत उलगुलान महामोर्चा काढणार

उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले असले तरी आम्ही मागण्यांवर ठाम असून आमचे धरणे आंदोलन कायम असणार आहे. आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत उलगुलान महामोर्चा काढण्यात येईल. त्याची घोषणा लवकरच केली जाईल.

प्रशांत गावंडे, आंदोलनकर्ते

‘मागण्या शासनाकडे तातडीने पाठवू’

मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री व पालकमंत्री यांच्या आदेशानुसार आम्ही आदिवासी उपोषणकर्त्या युवकांची भेट घेतली. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन अन्नत्याग उपोषण मागे घेतले. मात्र, त्यांनी धरणे आंदोलन कायम ठेवले आहे. त्यांच्या मागण्या आम्ही शासनाकडे तातडीने पाठवून धोरणात्मक बाबींवर काय उपाययोजना करता येईल, याविषयी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. पुन्हा या आंदोलकांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.

आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक

ताज्या बातम्या

Video : वैभव सूर्यवंशी-तिलक वर्मा यांच्यात मैदानावर शाब्दिक बाचाबाची; अंपायरला करावी...

0
चेन्नई | Chennai चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात एक नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. ईस्ट झोनचा १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि...