अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगरसह राज्यातील विविध भागात गेल्या पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे राज्यातील प्रमुख धरणात एप्रिल महिन्यांच्या पहिल्या आठवड्यापर्यंत समाधानकारक पाणी साठा शिल्लक आहे. राज्यातील सर्व धरणात गेल्यावर्षी याच तारखेला 42 टक्के पाणी साठा होता, तो यंदा 49.73 टक्के आहे. मात्र, उन्हाची तीव्रता अधिक असल्याने धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत असून नगर जिल्ह्यात 10 मार्चला असणार पाणी साठा आणि 10 एप्रिलला असणार्या पाणी साठ्यात दहा टक्क्यांनी घट आली आहे. वाढत्या उन्हासोबत काही ठिकाणी पाण्याच्या आवर्तनामुळे धरणातील पाणी साठा खपाटीला जातांना दिसत आहेत.
नगर जिल्ह्यात तीन प्रमुख धरणासोबत सहा मध्यम प्रकल्प आहेत. या ठिकाणी सध्या समाधानकारक पाणी साठा असला तरी गेल्या महिनाभरात उन्हाच्या झळा वाढल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वाढत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे पाणी साठा कमी होतांना दिसत आहे. नगर जिल्ह्यात मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणात 10 मार्चला 66. 72 टक्के पाणी साठा होता. तो आता 10 एप्रिलला 56 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तसेच मागील 2025 ला याच धरणातील पाणी साठा 49 टक्के होता. सध्या भंडारदरा धरणात 6 हजार 276 दक्षलक्ष घटनफुट (56.85 टक्के), मुळा 14 हजार 743 दक्षलक्ष घटनफुट (56.70 टक्के) आणि निळवंडे धरणात 5 हजार 517 दक्षलक्ष घटनफुट (66.31 टक्के) पाणीसाठा (10 एप्रिलचा) शिल्लक आहे.
तर जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्पात सध्या 44.70 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हाच पाणीसाठा 10 मार्चला 62.11 टक्के होता. राज्यातील जिल्हानिहाय प्रकल्पात सध्या 49.76 टक्के पाणीसाठा असून तो मागील वर्षी 42 टक्के होता. मागील वर्षीच्या सरासरी राज्यात आठ टक्के अधिक पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील धरणात 10 मार्चला 66.72 टक्के तर सहा मध्यम प्रकल्पात 62.11 टक्के पाणीसाठा होता. तो आता 10 एप्रिलला म्हणजेच महिनभरात अनुक्रमे तीन धरणात 56 टक्के, सहा मध्यम प्रकल्पात 45.70 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
प्रकल्पनिहाय पाणी साठा
भंडारदरा 6 हजार 276 (56.85 टक्के).
मुळा 14 हजार 743 (56.70 टक्के).
निळवंडे 5 हजार 517 (66.31 टक्के).
आढळा 703 (66. 32 टक्के).
मांडओहळ 90 (22.61 टक्के).
घाटशिळ 190 (43.48 टक्के).
सीना 1 हजार 433 (59.71 टक्के).
खैरी 260 (48.80 टक्के).
विसापूर 301 (33.29 टक्के).
अजून 60 दिवस तीव्र उन्हाचे
जिल्ह्यात एप्रिल महिन्यांतील 20 तर मे महिन्यांतील 30 तसेच जून महिन्यांतील सुरूवातीचे दहा दिवस तीव्र उन्हाचे राहणार आहे. या काळात पाणी टंचाईसह धरणातील आणि मध्यम प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन वाढणार आहे. तसेच यंदा पावसाळा कधी सुरू होणार, त्यांची सुरूवात धुव्वाधार की संथ यावर बर्याच गोष्टी अवलंबून असल्याने शिल्लक पाणी जपून वापरने हा सर्वोत्तर पर्याय ठरणार आहे.





