कळवण | प्रतिनिधी Kalwan
कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्याजवळ रविवारी (दि. २६ जुलै) सकाळी सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पत्नीची बहीण गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून शैक्षणिक क्षेत्रावरही शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १५ ईपी ३०३१ क्रमांकाची मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणारी गाडी खामखेडा येथून पिळकोसच्या दिशेने जात होती. त्याचवेळी एमएच ३९ पी २४४९ क्रमांकाच्या दुचाकीवरून दिनेश करणसिंग गावित, त्यांची पत्नी कीर्ती गावित आणि पत्नीची बहीण त्रिशा गावित हे कळवणकडून सटाणाच्या दिशेने आपल्या मूळगावी प्रतापपूर ता. नवापूर येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात असताना पिळकोस ता.कळवण येथील फाट्याजवळ दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली.
या भीषण अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दिनेश गावित आणि कीर्ती गावित या नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर त्रिशा गावित यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
मृत कीर्ती गावित या डांग सेवा मंडळ संचलित जनता विद्यालय, अभोणा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. तर दिनेश गावित हे जलसंपदा विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत होते. मे महिन्यातच या दोघांचा विवाह झाला होता. नव्या संसाराची सुंदर स्वप्ने डोळ्यांत साठवून निघालेल्या या दाम्पत्याचा अवघ्या दोन-अडीच महिन्यांतच अपघातात झालेला दुर्दैवी अंत कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शाळेतील शिक्षक-विद्यार्थ्यांसाठी मोठा धक्का ठरला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामदास गवळी व पोलीस शिपाई नितीन वाघमारे करीत आहेत.




