ग्लासगो | वृत्तसंस्था
कॉमनवेल्थ गेम्स 2026 च्या चौथ्या दिवशी भारताने दमदार सुरुवात करत पदकांची कमाई सुरू ठेवली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारताची स्टार खेळाडू मीराबाई चानू हिने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले, तर ऋषिकांत सिंग याने रौप्यपदक जिंकून भारताच्या पदकसंख्येत भर घातली. या दोन पदकांसह भारताच्या कामगिरीला नवसंजीवनी मिळाली असून आजच्या दिवसात आणखी पाच पदके जिंकण्याची आशा भारतीय क्रीडाप्रेमींना आहे.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताला केवळ एक पदक मिळाले होते, तर तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंना पदकविना परतावे लागले. मात्र चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी जोरदार पुनरागमन केले.
महिलांच्या 48 किलो वजनी गटात खेळणाऱ्या 31 वर्षीय मीराबाई चानूने एकूण 190 किलो वजन उचलत सुवर्णपदकावर नाव कोरले. या विजयासह तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग तिसरे सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक हॅट्ट्रिक पूर्ण केली.
स्पर्धेदरम्यान स्नॅच प्रकारातील पहिल्या प्रयत्नात 82 किलो वजन उचलण्यात तिला अपयश आले. मात्र त्यानंतर तिने चॅम्पियनसारखे पुनरागमन करत दुसऱ्या प्रयत्नात 82 किलो वजन उचलले आणि राष्ट्रकुल स्पर्धेचा नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यानंतरच्या प्रयत्नातही तिने विक्रमात सुधारणा करत कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात नवा मानदंड निर्माण केला.
चानूने उचललेले 190 किलो एकूण वजन हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च वजन ठरले आहे. एवढेच नव्हे तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, ऑलिम्पिक यांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही राष्ट्रकुल देशाच्या कोणत्याही खेळाडूने उचललेले हे सर्वोच्च वजन असल्याचा मान तिने मिळवला आहे.
दरम्यान, वेटलिफ्टिंग हा भारताचा राष्ट्रकुल स्पर्धेतील पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. आतापर्यंत भारतीय वेटलिफ्टर्सनी दोन पदके जिंकून ही परंपरा कायम राखली आहे. आता पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात एम. राजा पदकासाठी मैदानात उतरणार असून भारताच्या पदकसंख्येत आणखी भर पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




