अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा बँकेच्या जनरलच्या सहा जागा आणि सोसायटी मतदारसंघातील चार अशा दहा जागांसाठी येत्या 2 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते एका बाजूला असून दुसर्या बाजूला खा. निलेश लंके आणि त्यांची टीम दिसत आहे. या निवडणुकीसाठी आता काही मोजके दिवस शिल्लक असून पुढील रविवारपर्यंत निवडणुकीतील उमेदवारांना जाहीर प्रचार करता येणार आहे. यामुळे दोन दिवसांपासून निवडणुकीतील उमेदवारांनी मतदारांसह तालुका पातळीवरील नेत्यांच्या भेटीचा धडाका सुरू केला आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बिनविरोधच्या सर्वपक्षीय चर्चेनंतर सोसायटी मतदारसंघातील अकोले, कर्जत, पारनेर आणि राहुरी या ठिकाणी निवडणूक लादली होताना दिसत आहे. तर जनरलच्या बिगरशेती वगळता उर्वरित पाच जागा असून यात दोन महिला अशा सहा मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. सोसायटी मतदारसंघातील नेवासा आणि संगमनेर सर्वप्रथम बिनविरोध झाल्यानंतर त्यानंतर माघारीच्या मुदतीत उर्वरित आठ मतदारसंघातील सोसायटीच्या जागा अविरोध झाल्या. मात्र, चर्चेच्या अनेक राऊंडनंतर देखील अकोले, पारनेर, कर्जत आणि राहुरी सोसायटी मतदारसंघ बिनविरोध करण्यात जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना यश आले नाही. याला स्थानिक राजकीय स्थिती आणि समिकरणे आडवी आली.
जिल्ह्यात सर्वात गुंतागुंतीचे स्थानिक राजकारण श्रीगोंद्यात होते. त्या ठिकाणी आ. विक्रम पाचपुते यांचे बंधू प्रतापसिंह पाचपुते आणि माजी संचालक राहुल जगताप यांच्या उमेदवारीवरून तीव्र स्पर्धा असताना चर्चेच्या गोळाबेरेजत दत्तात्रय पानसरे यांची लॉटरी लागली आणि ते बँकेसाठी बिनविरोध संचालक झाले. जिल्ह्यात एका बाजूला निवडणूक बिनविरोध अशी जोरदार चर्चा असताना कर्जत तालुक्यातील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सभापती राम शिंदे समर्थकांमधील तिढा अखेरपर्यंत सुटला नाही आणि त्या ठिकाणी निवडणूक करण्याची वेळ आली. मात्र, या गडबडीत जामखेडची जागा कशीबशी बिनविरोध झाली.
राहुरी सोसायटी मतदारसंघात तनपुरे यांना सोपी आणि एकतर्फी असणार्या जागेवर आता पूर्ण तयारीनिशी लढत द्यावी लागणार आहे. या ठिकाणी भाजपमधील नव्या-जुन्या गटात झुंज होणार आहे. अकोले तालुक्यात आ. किरण लहामटे हे सोसायटी मतदारसंघातून लढत असून त्यांच्या उमेदवारीला विरोध करणारे वैभव पिचड हे अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात शिफ्ट झाले असून आता लहामटे यांची लढत माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांच्या कन्येशी होणार आहे. या ठिकाणी लहामटे यांच्या समोर तडगे आव्हान राहणार आहे. जिल्ह्याचे लक्ष पारनेर सोसायटी मतदारसंघाकडे राहणार असून खा. लंके यांच्या पराभवासाठी जिल्ह्यातील सर्व अदृष्य ताकदी कामाला लागल्या असून लंके हारणार की जिंकणार यावर त्यांचे पुढील राजकीय भविष्य निश्चित होणार आहे.
अशी होईल मतदान प्रक्रिया
चार सोसायटी मतदारसंघात स्थानिक पातळीवर चार मते दिल्यानंतर त्या ठिकाणी असणार्या मतदारांना जनरलच्या सहा जागांवर असणार्या मतदारांना मतदान करावे लागणार आहे. तसेच ज्या ठिकाणी निवडणूक सोसायटी मतदारसंघ बिनविरोध झालेली आहे. त्या ठिकाणी असणार्या मतदारांना केवळ जनरलच्या सहा जागांसाठी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यावेळी क्रॉस व्होटींग करताना दक्षता घ्यावी लागणार आहे. अन्यथा मतदान बाद होण्याची शक्यता अधिक राहणार आहे.
मतदारांना मिठाई आणि फटाके वाटप
रविवारपासून ग्रामीण भागात जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दोनही गटाकडून प्रचारदौरे सुरू करण्यात आले आहे. यात विखे- थोरात आणि गडाख गटाच्या उमेदवारांसह लंके- ढाकणे- सदाशिव लोखंडे गटाच्या उमेदवार आणि नेत्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मिठाई आणि फटाक्याचे वाटप सुरू झाले आहे. रविवारी दिवसभर जिल्ह्याच्या विविध भागातून नेत्यांच्या दौर्यांच्या खमंगदार वृत्ती येत होती.




