अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तातडीने लोकप्रिय निर्णय घेण्यापेक्षा बँकेची आर्थिक परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे. शेतकर्यांना दिल्या जाणार्या योजना अधिक सक्षमपणे राबविण्यावर भर राहणार आहे. शेतकरी संघटनेची भूमिका आणि मागण्या समजून घेतल्या आहेत. शेतकर्यांना न्याय मिळावा आणि सहकारी साखर कारखान्यांनाही आर्थिक अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे नूतन अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी गुरूवारी नगरला बँकेत विविध विषयांवर भूमिका मांडली. बँकेचे नाव अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेऐवजी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक करण्याचा प्रस्ताव असून, यासाठी आरबीआयच्या तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीमुळे आगामी काळात कारखान्यांसमोर अडचणी असतील. अशा परिस्थितीत केवळ ऊसदराच्या मागणीवर निर्णय घेऊन कारखाने अडचणीत येणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी लागेल. शेतकरी संघटनेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
व्यक्तिगत टीका आणि आरोपांची पातळी खालावू नये, यावर सर्वांचे एकमत
दरम्यान, सहकारी बँकेच्या निवडणुकीत विविध पक्षांचे नेते एकत्र आल्याने जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू असली, तरी ही केवळ सहकार क्षेत्रातील निवडणूक होती. राजकीय पातळीवर प्रत्येकजण आपापल्या पक्षाची भूमिका मांडेल; मात्र व्यक्तिगत टीका आणि आरोपांची पातळी खालावू नये, यावर सर्वांचे एकमत असल्याचेही डॉ. सुजय विखे यांनी स्पष्ट केले.




