Tuesday, September 8, 2026
HomeनगरAhilyanagar : फेब्रुवारी 2026 मध्ये जिल्हा बँकेचा बिगूल?

Ahilyanagar : फेब्रुवारी 2026 मध्ये जिल्हा बँकेचा बिगूल?

बदलेल्या राजकीय समिकरणाचा होणार परिणाम || अनेक तालुक्यातून नव्या दमाचे कारभारी

अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar

राज्यातील बड्या सहकारी संस्थांपैकी एक असणार्‍या आणि आशिया खंडातील मोठी आर्थिक संस्था म्हणून लौकीक असणार्‍या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुदत फेब्रुवारी 2026 मध्ये संपणार आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी आता केवळ सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असून आतापासून जिल्हा बँकेच्या वर्तुळात आगामी निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज्यासह नगर जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समिकरणाचे पडसाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमटणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सहकाराच्या आणि बँकेच्या राजकारणात अनेक तालुक्यातून नव्या दमाच्या चेहर्‍यांना संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

नगर जिल्हा बँक ही राज्यातील बड्या सहकारी संस्थांपैकी महत्वाची सुबक आर्थिक घडी बसलेली संस्था आहे. या ठिकाणी आतापर्यंत सहकारातील नेत्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून राजकारण केल्याचा इतिहास आहे. मात्र, आता देशपातळीवर सहकार खात्याची निर्मिती झाली असून बँकेवर भाजपचे बडे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व असल्याचे दिसत आहे. यामुळे एका प्रकारे जिल्हा बँकेत भाजपचा शिरकाव झाल्याचे दिसत असून येणार्‍या निवडणुकीत भाजपचे नेते हे वर्चस्व कायम ठवणार का? असा प्रश्न आतापासून उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे वर्चस्व असल्याचे दिसत असले तरी प्रत्येक तालुक्यात स्थानिक नेत्यांचे प्रभाव असल्याचे दिसून आलेले आहे. ही परंपरा पुढील निवडणुकीत कायम राहणार असली तरी अनेक तालुक्यातून बड्या राजकीय कुटूंबातील नवीन नेतृत्वाची एंट्री जिल्हा बँकेच्या निमित्ताने सहकाराच्या राजकारण होणार असल्याचे दिसत आहे. यामुळे श्रीरामपूर, राहाता, पारनेर, कर्जत-जामखेड, नगर, संगमनेर, अकोले या तालुक्यातून नवीन चेहरे जिल्हा बँकेला संचालक म्हणून मिळणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे सहा महिन्यांनी होणार्‍या जिल्हा बँकेच्या निवडणुकीला वेगळे महत्व राहणार आहे.

आधी स्थानिक स्वराज संस्था त्यानंतर बँक
जिल्ह्यात दिवाळीच्या दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. त्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी बँकेच्या सभासद शेतकर्‍यांसह विविध कार्यकारी सोसायटीचे संचालकांना मतदानाचा मान असला तरी प्रत्येक तालुक्यातील सहकाराच्या कार्यक्षेत्रातील राजकारण बँकेच्या निवडणुकीसाठी ढवळून निघत असल्याने बँकेच्या निवडणुकीत मोठे अर्थ ‘कारण’ दडलेले आहे.

अशी आहे बँकेची आर्थिक स्थिती
जिल्हा बँकेचे भाग भांडवल हे 38 हजार कोटी रुपयांचे असून 10 हजारांहून अधिकच्या ठेवी आहेत. बँकेच्यावतीने कर्जापोटी 7 हजार कोटीचे वाटप करण्यात आलेले असून यात पिक कर्जाचा वाटा हा 3 हजार 500 ते 4 हजार कोटींचा आहे. यंदा कर्जमाफीच्या आशेमुळे बँकेच्या वसूलीवर परिणाम झाल्याचे दिसत असून एकूण शेती कर्जाच्या 52 टक्के वसूली झाल्याचे दिसत आहे.

जिल्हा बँकेत डॉ. विखे यांची एन्ट्री ?
काही महिन्यांपूर्वी विखे कारखान्यांचे अध्यक्षपदी निवड झालेले माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संभाव्य उमेदवार असणार आहेत. जिल्हा बँकेच्या राजकारण आणि अर्थकारणात एन्ट्री करून जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या नाड्या आवळण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्हा बँकेत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याबाबत विखे पाटील यांच्याकडून वर्तुळातून या विषयावर मौन बाळगण्यात आले असल्याचे दिसत आहे.

थोरातांच्या उमेदवाराबाबत उत्सुकता
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संगमनेर तालुक्यातील राजकीय समिकरण बदल्याचे दिसत आहे. यामुळे जिल्हा बँकेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आ. बाळासाहेब थोरात यांचा उमेदवार कोण असणार याकडे जिल्ह्याचे नव्हे, तर राज्याचे लक्ष राहणार आहे. या ठिकाणी थोरात कुटूंबातील व्यक्तीला संधी देणार की कार्यकर्त्यांना चाल देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी संलग्न जिल्ह्यांशी समन्वय आवश्यक – विभागीय आयुक्त डॉ....

0
नाशिक, दि. 8 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा): Nashik नाशिक –त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील वाहतूक, आरोग्य, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन यांच्या नियोजनासाठी नाशिकसह संलग्न जिल्ह्यांचाही सहभाग महत्वाचा...