Wednesday, September 30, 2026
HomeनगरAhilyanagar : पंचनाम्यासाठी गावपातळीवर ग्रामसमित्या गठीत

Ahilyanagar : पंचनाम्यासाठी गावपातळीवर ग्रामसमित्या गठीत

महसूल, कृषी आणि ग्रामविकासचे 5 हजार कर्मचारी आजपासून बांधावर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पावसाचा मोठा खंड आणि अपुर्‍या पावसामुळे खरीप हंगामावर संकट ओढवले असताना शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया आजपासून (दि. 29) जिल्ह्यात सुरू होत आहे. राज्य शासनाने पावसाच्या खंडामुळे राज्यातील 265 तालुक्यांमध्ये विविध सवलती व उपाययोजना लागू केल्या आहेत. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांचा समावेश आहे. शासनाच्या निर्देशानुसार महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाचे सुमारे पाच हजार कर्मचारी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करणार आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यातील गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांचा समावेश असलेल्या ग्रामसमित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांमार्फत शेतातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे केले जाणार आहेत. प्रशासनाने पुढील आठ दिवसांत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 300 मिलिमीटर म्हणजेच 70 टक्के पावसाची नोंद झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात काही प्रमाणात समाधानकारक पाऊस झाला असला, तरी जिल्ह्यातील 131 महसूल मंडळांपैकी तब्बल 112 मंडळांमध्ये पावसाचा मोठा खंड पडला आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये खरीप पिकांना फटका बसला असून उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 610 गावांमध्ये तलाठी, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात येणार आहेत. पंचनाम्यावेळी शेतातील क्षेत्रफळ, पिकाचा प्रकार, पिकाची सद्यस्थिती आणि झालेल्या नुकसानीची नोंद केली जाणार आहे.

शेतकर्‍यांची उपस्थिती आवश्यक
पंचनामा करताना संबंधित शेतकर्‍यांनी आपल्या शेतात उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे नुकसानीची नोंद झाल्यानंतर शासनाच्या निकषानुसार पुढील दुष्काळी उपाययोजना आणि शेतकर्‍यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.पावसाच्या खंडामुळे लागू करण्यात आलेल्या ट्रिगर-1 अंतर्गत विविध उपाययोजना जिल्ह्यात लागू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पंचनाम्याची प्रक्रिया शेतकर्‍यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

पाणी टंचाईचे संकट आतापासूनच
दरम्यान, जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकटही गंभीर होण्याची चिन्हे आहेत. मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी अनेक लघुप्रकल्प आणि गाव तलाव अद्याप कोरडे आहेत. परिणामी काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आतापासूनच जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील 125 गावे आणि 672 वाड्या-वस्त्यांना सध्या 133 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. खरीप पिकांचे नुकसान आणि आगामी काळातील पाणीटंचाई या दोन्ही संकटांचा सामना प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज खरेदीला इच्छुकांच्या उड्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या...