Saturday, November 21, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २१ नोव्हेंबर २०२६ - मित्रपक्षांचाच भाजपला शह!

संपादकीय : २१ नोव्हेंबर २०२६ – मित्रपक्षांचाच भाजपला शह!

राजकारणात विरोधकांपेक्षा मित्रपक्षच अधिक पेच निर्माण करू शकतात, याचा प्रत्यय सातारा आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदांच्या निवडीतून आला आहे. सत्तेत भागीदारी असलेल्या महायुतीतील भाजपला त्याच्याच मित्रपक्षांनी स्थानिक पातळीवर सत्तेपासून दूर ठेवले. सातार्‍यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने, तर सांगलीत काँग्रेस आणि शिवसेनेने राजकीय समीकरण जुळवत भाजपला धक्का दिला. या निवडी महायुतीतील अंतर्गत संघर्ष, स्थानिक नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि सहकार क्षेत्रातील राजकीय संघर्षाचे दर्शन घडवणार्‍या आहेत.

- Advertisement -

सातार्‍यात २१ संचालकांत भाजपचे नऊ, राष्ट्रवादीचे आठ आणि शिवसेनेचे चार निवडून आले होते. भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष असला, तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकत्रित संख्याबळाने बाजी मारली. राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील उंडाळकर अध्यक्षपदी, तर शिवसेनेचे दीपक चव्हाण उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले. त्यामुळे भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांना राजकीय धक्का बसला. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने अवघ्या एका मताने विजय मिळवत शिवसेना आणि राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवले होते. त्या पराभवाचा हिशेब जिल्हा बँकेच्या निवडीत चुकता झाल्याची चर्चा आहे. या निवडीनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जखमा भरून येण्यासाठी जालीम औषधाची गरज असते, असे सूचक विधान केले.

मंत्री मकरंद पाटील यांनी राजकारणात जखमा होत असतात; मात्र पुढे जात राहावे लागते, अशी भूमिका घेतली. त्यावर जयकुमार गोरे यांनी अघोरी विद्येने जखम बरी करण्याचा प्रयत्न केल्यास परिणाम गंभीर होऊ शकतात, असा टोला लगावला. या शाब्दिक चकमकींमधून महायुतीतील वरवरच्या एकजुटीमागील अस्वस्थता उघड झाली. सांगलीतील घडामोडी भाजपसाठी अधिक विचार करायला लावणार्‍या आहेत. तेथे काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्षपदी, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्षपदी निवडून आले. तब्बल २२ वर्षांनंतर सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर काँग्रेसला संधी मिळाली. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सहकार क्षेत्रात आपले वर्चस्व दाखवले. अखेरच्या जुळवाजुळवीत भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यात आले.

या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी जिल्हा सहकारी बँका आहेत. सहकार चळवळीचा पाया परस्पर सहकार्य, लोकसहभाग आणि सामूहिक आर्थिक उन्नती हा आहे. शेतकरी, दूध उत्पादक, लघुउद्योजक आणि ग्रामीण भागातील सामान्य खातेदार यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी जिल्हा बँका महत्त्वाची भूमिका बजावतात. पीककर्ज, शेतीसाठी भांडवल, पीकविमा व अनुदानाच्या व्यवहारांपासून ते ग्रामीण अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यापर्यंत त्यांचे काम विस्तारलेले असते. त्यामुळे या बँका केवळ राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेचे किंवा गटबाजीचे केंद्र बनणे ही सहकाराच्या मूळ संकल्पनेशी प्रतारणा ठरेल. सहकारी संस्थांवर नियंत्रण मिळवण्यामागे स्थानिक राजकारणाची गणिते असतात.

बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक प्रवाह, कार्यकर्त्यांचे जाळे आणि मतदारांशी संपर्क यावर प्रभाव निर्माण होतो. म्हणूनच अध्यक्षपदासाठी चुरस असते. मात्र संचालक मंडळाची जबाबदारी पदाचा राजकीय फायदा घेण्यापुरती मर्यादित नाही. थकीत कर्जांचे व्यवस्थापन, वसुलीतील शिस्त, ठेवीदारांचा विश्वास, कर्जवाटपातील पारदर्शकता आणि पात्र शेतकर्‍यांना वेळेवर अर्थसहाय्य या कसोट्यांवर बँकेचे यश ठरले पाहिजे. सहकारातील लोकशाही टिकवण्यासाठी वार्षिक लेखापरीक्षण वेळेवर होणे, सभासदांना माहिती उपलब्ध होणे, सर्वसाधारण सभांमध्ये प्रश्नांना उत्तरे मिळणे आणि निर्णय सामूहिक पद्धतीने घेतले जाणे तितकेच आवश्यक आहे.

बँकेच्या संचालकांनी राजकीय निष्ठेपेक्षा सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले, तरच सहकारावरील विश्वास दृढ होईल, अन्यथा निवडणुका जिंकल्या जातील; पण संस्था आणि तिचे सभासद मात्र हरतील. राज्यातील सत्ता आणि जिल्हा पातळीवरील समीकरणे वेगळी असू शकतात; स्थानिक स्वायत्ततेलाही जागा असली पाहिजे. पण मित्रपक्षांनी एकमेकांना शह देण्याच्या नादात सहकारी संस्थांचे कामकाज ठप्प होऊ देऊ नये. भाजपनेही संख्याबळ किंवा सत्तेचा प्रभाव पुरेसा मानण्याऐवजी मित्रपक्षांच्या राजकीय आकांक्षा आणि स्थानिक वास्तव समजून घ्यावे.

सातारा-सांगलीतील सत्तांतराचा खरा अर्थ तेव्हाच अधोरेखित होईल, जेव्हा शेतकर्‍यांना सुलभ आणि वेळेवर कर्ज मिळेल, ठेवी सुरक्षित राहतील आणि बँकांचा कारभार पारदर्शक बनेल. राजकीय जखमा भरून निघतील; पण सत्तासंघर्षात सहकार क्षेत्राला जखमा झाल्या, तर त्याची किंमत ग्रामीण समाजाला मोजावी लागेल. सहकार हा सत्तेचा जिना नसून सामूहिक विकासाचा आधार आहे. अध्यक्षपद कोणाकडे गेले यापेक्षा त्या पदावरून शेतकर्‍यांच्या आयुष्यात किती आर्थिक बळ निर्माण झाले, हाच या निवडींचा खरा निकाल ठरला पाहिजे.

ताज्या बातम्या

Cricket : रायझिंग स्टार्स आशिया चषक : भारताचा नेपाळवर ३०६ धावांनी...

0
दोहा रायझिंग स्टार्स आशिया चषक स्पर्धेत भारत ‘अ’ संघाने नेपाळविरुद्ध ऐतिहासिक विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करत भारताने ५० षटकांत ९ विकेट गमावत ३३२ धावांचा...