नाशिक | Nashik
नाशिक शहर भाजपच्या शहराध्यक्षपदावरून सुनील केदार (Sunil Kedar) यांचा राजीनामा घेण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर शहरातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. गेल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात केदार यांच्या नेतृत्वाभोवती निर्माण झालेले वाद, महापालिका निवडणुकीतील तिकीटवाटपापासून महापौर-उपमहापौर निवडीपर्यंतचे नाराजीनाट्य आणि त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून निर्माण झालेला तणाव यामुळे अखेर त्यांच्या राजीनाम्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे.
शहराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये (BJP) मोठी चुरस असताना सुनील केदार यांच्या नावाची घोषणा झाली होती. त्यानंतर पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, तिकीटवाटपाच्या प्रक्रियेपासूनच पक्षांतर्गत मतभेद उफाळून आले. महापौर आणि उपमहापौर निवडीच्या वेळीही या मतभेदांना पुन्हा तोंड फुटले. महापौरपदासाठी आपण सुचविलेल्या नावाला संधी न मिळाल्याची नाराजी व्यक्त करत केदार यांनी टेक्स्ट मेसेजद्वारे राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी महापौर व उपमहापौरांच्या नावांची घोषणा केल्यानंतर केदार यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली होती.
मात्र, वरिष्ठ पातळीवरून कानउघडणी झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासांत त्यांनी राजीनामा मागे घेतला आणि ‘समाधान झाले’ अशी भूमिका मांडली होती. हा वाद तेथेच शमला नाही. महापालिकेत (Mahapalika) भाजपला स्पष्ट बहुमत असतानाही शिवसेना आणि राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेण्याच्या हालचाली केल्याचा मुद्दा चर्चेत आला. यावरून वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून पुन्हा पक्षांतर्गत समीकरणे ढवळून निघाली. स्वीकृत नगरसेवकांच्या यादीत स्वतःचे नाव चर्चेत असताना, शहराध्यक्ष म्हणून प्रदेशाध्यक्षांची परवानगी घेण्याऐवजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून यादी अंतिम करण्याच्या हालचाली झाल्याची चर्चा रंगली. यामुळे वरिष्ठ पातळीवर नाराजी अधिकच वाढल्याचे समजते.
दरम्यान, केदार यांनी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांशी संवाद कमी केल्याने वरिष्ठ नेतृत्वाने या सर्व घडामोडींची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले जाते. नव्या शहराध्यक्षासाठी कोअर कमिटीने इच्छुकांशी चर्चा सुरू केल्याची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी यापूर्वी राजीनामा मागे घेतला होता; मात्र त्यानंतरही पक्षांतर्गत मतभेद पूर्णपणे मिटले नसल्याचे स्पष्ट झाले. राजीनामा देऊन मागे घेण्याच्या ‘स्टंट’पासून थेट पदावरून पायउतार होण्यापर्यंतचा केदार यांचा प्रवास नाशिक भाजपच्या (Nashik BJP) अंतर्गत राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. पक्षाच्या निर्णयप्रक्रियेला आव्हान देणारी भूमिका, स्थानिक पातळीवरील नाराजी आणि वरिष्ठ नेतृत्वाशी वाढलेले मतभेद यामुळे अखेर त्यांचे शहराध्यक्षपद धोक्यात आले आणि त्यांच्या राजीनाम्याने या राजकीय अध्यायावर पडदा पडल्याचे मानले जात आहे.




