अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उद्या 2 नोव्हेंबर रोजी मतदान होऊन त्यानंतर लगेच 3 तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या प्रचारातील शेवटच्या टप्प्यात आजचा रविवार महत्त्वाचा ठरणार आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी दहा ठिकाणी निवडणूक होणार असली तरी यातील काही निवडक ठिकाणी अटीतटीची लढत होणार असल्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर आधी अर्ज दाखल करणे, त्यानंतर छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. बँकेचे निवडणुकीत खर्याअर्थाने माघारीचे प्रक्रियेनंतर रंगत वाढू लागली. माघारीच्या एक दिवस आधी जिल्ह्यातील सर्वपक्षीय बैठकीत बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा झाल्यानंतर देखील माघारीच्या दिवशी दहा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांचे अर्ज राहिल्याने त्या ठिकाणी निवडणूक करणार आहे.
यात पारनेर, कर्जत, अकोले या सोसायटी मतदारसंघातील निवडणूक जिल्ह्याचे लक्ष लागले असून राहुरीतील निवडणूक अन्य सोसायटी मतदारसंघाच्या तुलनेत सोपी असल्याची चर्चा आहे. दरम्यान सर्वसाधारणच्या सात जागांपैकी बिगर शेती मतदारसंघातील जागा बिनविरोध झालेली असून आता चार मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. यात प्रथमदर्शनी पॅनल टू पॅनल मतदान होण्याची शक्यता असली तरी ऐनवेळी क्रॉस वोटिंग झाल्यास त्याचा फटका कोणाला बसणार याबाबत आत्ताच सांगणे कठीण असल्याची काही मतदारांच्या वतीने सांगण्यात आले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज रविवार हा शेवटचा सुपर संडे ठरणार असून निवडणुकीत शेवटच्या दिवशी कोण चौकार, षटकार मारणार याकडे मतदारांची लक्ष राहणार आहे.
दोनही बाजूने मतदानाची तयारी पूर्ण
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर तयारी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदानासाठी आवश्यक मनुष्यबळ, पोलीस बंद, यंत्रणा, जागा याची तयारी केली आहे. तर निवडणुकीतील तीनही लंगड्या पॅनलकडून आपआपल्या बाजून मतदान घडवून आणण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे.




