श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
शहरात कल्याण आणि मुंबई मटक्याचा जुगार उघडपणे सुरू असल्याचा आरोप होत आहे. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शनी चौकात तीन ते चार मटका बुकी सुरू असल्याने पोलिसांच्या कारवाईबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर आणि अन्य गजबजलेल्या भागांत मटक्याचे आकडे घेतले जात असल्याचे सांगितले जाते. झटपट पैसे मिळविण्याच्या आमिषाने तरुण, मजूर आणि सर्वसामान्य नागरिक जुगाराच्या आहारी जात असून, अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
तालुक्यात चोरी, वाहनचोरीसह अन्य गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मटका, बिंगो आणि इतर अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे. पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशी यंत्रणा कार्यरत असतानाही हे व्यवसाय सुरू असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी या प्रकाराची चौकशी करून मटका बुकींसह अन्य अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




