अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
किराणा खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या दोघा चोरट्यांनी दुकानदार महिलेच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना बोल्हेगाव येथील भाऊ पाटील चौकात घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविता चेमटे (वय 38, रा. राघवेंद्र स्वामी मंदिर रोड, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्या भाऊ पाटील चौकात स्वतःचे स्वामी समर्थ किराणा दुकान चालवतात. त्या शुक्रवारी (20 नोव्हेंबर) सायंकाळी दुकानात असताना दुचाकीवरून दोघे तेथे आले. त्यांच्या दुचाकीला नंबरप्लेट नव्हती. त्यातील एक जण दुचाकीवर रस्त्यावर थांबला, तर दुसर्याने दुकानात येऊन 175 रूपयांचे किराणा सामान खरेदी केले आणि पैसे देऊन तेथून निघून गेला. दरम्यान, 10 ते 15 मिनिटांनंतर म्हणजेच सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तेच दोघे पुन्हा दुकानाजवळ आले.
एक जण दुचाकीवर थांबला, तर दुसरा सामान घेण्याच्या बहाण्याने दुकानात शिरला. फिर्यादी चेमटे या त्याला किराणा सामान देत असताना दुकानात कोणी नसल्याची खात्री करून त्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण ओढून घेतले. यावेळी चेमटे यांनी आरडाओरडा करत चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो दुकानाबाहेर रस्त्यावर थांबलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून पसार झाला.




