Tuesday, October 20, 2026
Homeनगरसोसायटी मतदारसंघांत स्वतंत्र प्रचार? जनरलच्या सात जागांच्या बिनविरोधाचा तिढा कायम

सोसायटी मतदारसंघांत स्वतंत्र प्रचार? जनरलच्या सात जागांच्या बिनविरोधाचा तिढा कायम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्हा पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच, दुसरीकडे सोसायटी मतदारसंघांत स्थानिक नेत्यांनी स्वतंत्र प्रचाराची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जनरलच्या सात जागा बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता दोन दिवस शिल्लक असून, बुधवारी (दि. २१) माघारीची अंतिम मुदत संपणार आहे. या कालावधीत राजकीय नेत्यांमध्ये एकमत घडते की निवडणुकीचा मार्ग मोकळा होतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेच्या २१ संचालकपदांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. दाखल उमेदवारी अजर्जापैकी आतापर्यंत केवळ १५ इच्छुकांनी माघार घेतली असून, अद्याप २०० अधिक अर्ज निवडणूक रिंगणात आहेत. माघारीसाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असून, त्यानंतर उद्या दसऱ्यानिमित्त सुटी राहणार आहे. बुधवारी माघारीचा अखेरचा दिवस असल्याने या दोन दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. अंतिम मुदतीपर्यंत उमेदवारांनी माघार न घेतल्यास संबंधित मतदारसंघांत निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा होईल.

दोन दिवसांत जादूची कांडी फिरणार ?

दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोण माघार घेणार, कोण सिमोल्लंघन करणार आणि कोण निवडणुकीच्या मैदानात ठाम राहणार, याची उत्सुकता आहे. माघारीच्या अखेरच्या दिवसापूर्वी नेत्यांमध्ये तडजोड घडून येणार का, याकडे सभासद शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या दोन दिवसांत राजकीय समीकरणे बदलून बिनविरोध निवडणुकीसाठी ‘जादूची कांडी’ फिरणार की मतदान अटळ ठरणार, हे बुधवारी स्पष्ट होईल.

सहा तालुक्यांत अद्याप संभ्रम

मागील पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा बँकेच्या २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर नगर, पारनेर, कर्जत आणि बिगरशेती मतदारसंघांत निवडणूक झाली होती. यंदाही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी अकोले, श्रीरामपूर, नगर, श्रीगोंदा, पारनेर आणि जामखेड या सोसायटी मतदारसंघांतील राजकीय समीकरणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. काही ठिकाणी उमेदवार आणि स्थानिक नेत्यांनी आपापली ताकद पणाला लावण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा पातळीवर बिनविरोध निवडणुकीची भूमिका मांडली जात असताना, आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी एका राजकीय गटाकडून व्यक्त होत आहे. बिनविरोध निवडणुकीला आमचा विरोध नाही; मात्र त्यासाठी सर्वांना विश्वासात घेण्याची गरज असल्याची भूमिका या गटाकडून मांडली जात आहे. त्यामुळे बिनविरोध प्रक्रियेत अडथळा नेमका कोणामुळे निर्माण होत आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात एकमत, तालुक्यांत स्वतंत्र डाव

जिल्हा पातळीवर होणाऱ्या निर्णयाची प्रतीक्षा करण्याऐवजी काही स्थानिक नेत्यांनी सोसायटी मतदारसंघांत स्वतंत्र प्रचाराची यंत्रणा सक्रिय केली आहे. स्थानिक पातळीवरील राजकीय ताकद, मतदारांशी असलेले संबंध आणि उमेदवारांची प्रतिष्ठा यामुळे तालुकानिहाय समीकरणे वेगळी बनत आहेत. जिल्हा पातळीवरील नेत्यांमध्ये तडजोड झाली, तरी स्थानिक पातळीवर उमेदवार माघार घेतीलच, याची खात्री नसल्याने बिनविरोध निवडणुकीचे आव्हान अधिकच वाढले आहे. विशेषतः जनरलच्या सात जागांबाबत अद्याप एकमत होत नसल्याने या जागा बिनविरोध करण्यासाठी कोण पुढाकार घेणार, हा प्रश्न कायम आहे. सोसायटी मतदारसंघांतील स्वतंत्र प्रचार आणि जनरलच्या जागांवरील वाटाघाटी यांचा ताळमेळ बसला नाही, तर बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न फसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

पंचवटी : चतुःसंप्रदाय आखाड्यातर्फे रामकुंड परिसरात रावणदहन

0
पंचवटी । प्रतिनिधी Panchavati वाईट प्रवृत्तीचा नाश करून सत्याचा विजय होतो, असा संदेश देत चतुःसंप्रदाय आखाड्यातर्फे परंपरेनुसार रामकुंड परिसरात रावणदहनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी...