Monday, November 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजतर त्यांना फासावर लटकवले पाहिजे...; अजित पवारांच्या अपघातावर मुख्यमंत्री म्हणाले, दादांच्या जाण्याचा...

तर त्यांना फासावर लटकवले पाहिजे…; अजित पवारांच्या अपघातावर मुख्यमंत्री म्हणाले, दादांच्या जाण्याचा चटका…

पुणे | प्रतिनिधी
अजितदादांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या मनात त्यांच्या अपघाताविषयी अनेक प्रश्न आणि संभ्रम निर्माण झाले आहेत. आंतरराष्ट्रीय यंत्रणा व अमेरिकन टीमच्या मदतीने सुरू असलेल्या या चौकशीचा अहवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लवकरात लवकर प्रसिद्ध करावा, अशी थेट मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. घटनेला आठ ते दहा महिने उलटून गेले असल्याने जर यात कोणी दोषी आढळले तर त्यांना फासावर लटकवले पाहिजे, आणि जर हा केवळ अपघात असेल तर जनतेच्या मनातील आक्रोशाला शांती मिळेल, असे मत त्यांनी मांडले.

महाराष्ट्राचे लाडके लोकनेते आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या पुणे जिल्हा परिषद परिसरातील अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि भव्य प्रवेशद्वाराचे नामकरण केंद्रीय गृह व सहकार मंत्रीअमित शाह यांच्या हस्ते सोमवारी अत्यंत भावुक वातावरणात पार पडले,त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री दिलीप वळसे- पाटील, आमदार माधुरी मिसाळ, योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, महापौर मंजुषा नागपुरे, पार्थ पवार, जय पवार, चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

जो दोषी असेल तर त्याला आम्हाला फासावर लटकवता आलं पाहिजे फडणवीस म्हणाले, दादांच्या जाण्याचा चटका तर आपल्या सगळ्यांच्या मनाला लागला आहेच, पण त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये जनमाणसाच्या मनामध्ये दादांच्या जाण्यानंतर काही प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा देखील झाल्यात आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला असं वाटतं की हे जे काही घडलंय ते नेमकं काय आहे? हा अपघात आहे की याच्या पाठीमागे काही घडलंय?याची स्पष्टता यावी, या संदर्भातली खरी माहिती आम्हाला मिळावी अशा प्रकारची एक बाब सातत्याने या महाराष्ट्रामध्ये चर्चेली जात आहे. म्हणून आज गृहमंत्री महोदयांना मी देखील सकाळी ही विनंती केली की, गृहमंत्री महोदय, आता जवळपास आठ ते दहा महिने होत आहेत आणि एक मोठी चौकशी चाललेली आहे. त्याच्यामध्ये अमेरिकेचे, वेगवेगळ्या राज्यांचे, राष्ट्रांचे लोक देखील ती चौकशी करत आहेत, त्यांच्या टीम देखील मदत करतायत. पण कुठंतरी महाराष्ट्रातल्या सामान्य व्यक्तीच्या मनातला संभ्रम दूर झाला पाहिजे.

या बाबतीतला जो काही अहवाल आहे, हा अहवाल लवकरात लवकर आला पाहिजे, जेणेकरून जर कोणी याच्यामध्ये दोषी असेल तर त्याला आम्हाला फासावर लटकवता आलं पाहिजे. आणि समजा याच्यामध्ये हा जर अपघात असेल तर किमान आमच्या सामान्य माणसाच्या मनातला आक्रोश आहे, त्या आक्रोशावर काहीतरी फुंकर पडली पाहिजे. या दृष्टीने आज मी अमित भाईंना ही विनंती देखील केली आणि अमित भाईंनी देखील आज त्या ठिकाणी आश्वस्त केलेलं आहे की, ते स्वतः लक्ष घालून या सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या चौकशीचा जो काही अहवाल आहे, हा अहवाल लवकरात लवकर या ठिकाणी आणण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. मी निश्चितपणे त्यांचे त्याकरता आभार मानतो आणि मला विश्वास आहे की अमित भाईंनी एकदा मनावर घेतल्यानंतर निश्चितपणे या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीने वेग देता येईल तो प्रयत्न ते करतील आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये या ज्या काही भावना आहेत, या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही शंका आहेत, या सगळ्या शंकांच्या संदर्भात त्याचं उत्तर देखील मिळणं हे अत्यावश्यक आहे. कणखर, शिस्तबद्ध, प्रशासनावर मजबूत पकड असलेला आणि दूरदृष्टीचा नेता

अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडताना फडणवीस यांनी त्यांना एक अत्यंत कणखर, शिस्तबद्ध, प्रशासनावर मजबूत पकड असलेला आणि दूरदृष्टीचा नेता म्हणून संबोधले. राजकारणात अनेकदा थेट बोलणे टाळले जाते, परंतु दादांकडे हे दोनच स्पष्ट शब्द होते. जे पटले त्याला म्हणून पाठीशी ठामपणे उभे राहायचे आणि जे अयोग्य वाटले ते तोंडावर थेट सांगण्याची हिंमत त्यांच्यात होती. अर्थमंत्री म्हणून अनेक अर्थसंकल्प मांडताना कठीण प्रसंगातही त्यांनी राज्याची आर्थिक शिस्त कधीही मोडू दिली नाही. कोणत्याही कामात लावलेल्या पैशांचे योग्य आउटपुट आणि कामाचा दर्जेदारपणा यावर त्यांचा नेहमीच कटिबद्ध आग्रह असायचा.

दादा, तुमचा प्रवास अर्धवट राहिला असेल, पण तुमच्या स्वप्नांचा प्रवास आम्ही पूर्ण करू; अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावूक


दादांच्या दैनंदिन जीवनातील शिस्त थक्क करणारी होती; सकाळी सहा वाजता तयार होऊन सात वाजता कामाला लागणारे आणि आठ वाजता मंत्रालयात पोहोचणारे दादा सर्वांनी पाहिले आहेत. दादा सकाळी सहापासून काम करायचे, फडणवीस दिवसा काम करायचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री उशिरापर्यंत काम करायचे, त्यामुळे अधिकाऱ्यांना २४ तास कामाला लागावे लागायचे, अशी गमतीशीर आठवणही त्यांनी आवर्जून सांगितली. तर दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी मोठे पाठबळ मिळाले असते अजितदादांच्या कणखर रूपामागे आपल्या माणसांवर उत्कट प्रेम करणारा आणि त्यांच्या पाठीशी कोणत्याही किंमतीवर ठामपणे उभा राहणारा भक्कम आधार होता.

सध्या महाराष्ट्रात असलेल्या भीषण दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेती आणि मातीशी नाळ जोडलेला हा गडी आज मैदानात असता तर दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी मोठे पाठबळ मिळाले असते, अशी हळहळ फडणवीस यांनी व्यक्त केली. आज त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजितदादांचा राजकीय व सामाजिक वारसा समर्थपणे चालवत आहेत. अजितदादांनी अर्धवट सोडलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि एक प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी संपूर्ण राज्य, महायुती सरकार व सर्व सहकारी सुनेत्राताई व पवार कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फडणवीस पुढे म्हणाले, सामान्यतः पुतळ्याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आनंद असतो, परंतु ज्यांच्याकडून महाराष्ट्राला अजून खूप मोठ्या कामांची अपेक्षा होती ते अजितदादा अचानक निघून गेल्याने सर्वांच्या मनात आठवणींचे काहूर आणि दुःख दाटले होते. पुणे जिल्ह्यावर आणि विशेषतः जिल्हा परिषदेवर अजितदादांचे अथांग प्रेम होते. त्यामुळेच पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन दादांचा पहिला अर्धाकृती पुतळा उभारण्याचा आणि प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, याबद्दल फडणवीस यांनी जिल्हा परिषदेचे आभार मानले. पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात, वाड्या-वस्त्यांवर विकास पोहोचवण्याचा ध्यास अजितदादांनी घेतला होता. त्यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे सुमारे सात ते आठ अध्यक्ष घडले. पुणे जिल्हा परिषद, पंचायत समित्या, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रगतीच्या आलेखात अजितदादांचे योगदान सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल, असे फडणवीस म्हणाले.

अजितदादांचे कार्य एका चौकटीत मावणारे नव्हते- एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. २८ डिसेंबर हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण करावे लागेल, अशी वेळ येईल, असे कधी वाटले नव्हते. सात वेळा आमदार झालेल्या अजितदादांचे कार्य एका चौकटीत मावणारे नव्हते. बारामतीसह पुणे जिल्ह्याच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांना पुण्याचे शिल्पकार म्हटले तरी वावगे ठरणार नाही, असे शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांची भेट झाल्यावर अशी आपुलकीने विचारपूस करायचे, असे त्यांनी सांगितले. अजितदादांच्या जाण्याने आमचा मोठा भाऊ गमावल्याचे दुःख असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या