मुंबई | Mumbai
माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात मृत्यू (Death) झाला होता. मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय काही राजकीय नेत्यांकडून व्यक्त केला जात होता. त्यावरून राज्याचे राजकारण देखील चांगलेच तापले होते. दुसरीकडे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या अपघातामागे असलेल्या ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील एक बडा नेता करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज (सोमवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत गंभीर आरोप केले आहेत.
मुख्यमंत्र्यांवर नेमके आरोप काय?
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी काही छायाचित्रे सादर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि VSR कंपनीचे मालक व्ही. के. सिंह (VK Singh) यांच्यातील जवळीकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “मी ज्या व्यक्तीचे नाव घेत आहे, त्यांनी अजितदादांचा घातपात केला असे मी म्हणत नाही; परंतु, अपघातग्रस्त कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जात असल्याचा आम्हाला ठाम संशय आहे,” असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे व्ही. के. सिंह यांच्या जयपूरमधील एका कौटुंबिक कार्यक्रमाला (लग्नाला) मफलर घालून उपस्थित होते, असा दावा करत रोहित पवारांनी एक फोटोही माध्यमांसमोर दाखवला. निवडणुकीच्या (Election) निकालाच्या दिवशीही नेते तिथे हजेरी लावतात, यावरून त्यांचे संबंध किती घनिष्ठ आहेत हे दिसून येते, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांकडे सत्ता, सीआयडी आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणा (CBI) देखील त्यांचे ऐकतात. तरीही या प्रकरणाचा सखोल तपास का होत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
VSR कंपनीच्या व्यवहारांवर आणि ड्रग्ज कनेक्शनवर संशय
रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत कंपनीच्या आर्थिक व्यवहारांबाबतही अनेक खळबळजनक दावे केले आहेत. ते म्हणाले, “अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या दोन दिवसांत व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंह याने अमेरिकेत १८ कोटी रुपयांचे घर विकत घेतले आणि ज्याच्याकडून हे घर घेतले तो ड्रग्ज तस्करीत गुंतलेला असल्याचा आरोप पवारांनी केला आहे. व्ही. के. सिंह यांच्या २७ कंपन्या असून, कोलकात्यातील कंपनीच्या माध्यमातून ८६८ कोटी रुपये काळ्याचे पांढरे करण्यात आले, मात्र ईडी (ED) यावर कोणतीही चौकशी करत नसल्याचे त्यांनी म्हटले. नागरी उड्डाण महासंचालनालयाकडे (DGCA) या अपघाताबाबत अनेक पुरावे देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
कोणालाही सोडणार नाही – रोहित पवार
रोहित पवार पुढे म्हणाले की, “जर मी स्वतःच्या काकाला न्याय देऊ शकलो नाही, तर सामान्य गरीब जनतेला काय न्याय देणार? यासाठी माझे राजकारण धोक्यात आले तरी मला त्याची पर्वा नाही. सत्तेत असूनही अजित पवारांच्या पक्षाला या प्रकरणी काही करता येत नसेल तर ते दुर्दैवी आहे. सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी तात्काळ व्ही. के. सिंह आणि व्हीएसआर कंपनीवर कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकावे, असे आव्हान देत २०२९ मध्ये आमचे सरकार आल्यास या प्रकरणातील कोणालाही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.



