अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू असणार्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार विकास युतीने 21 पैकी 17 जागा पटकावत बँकेच्या सत्तेवर बाजी मारत, जिल्ह्यातील सहकारावर आपले वर्चस्व असल्याचे सिध्द केले.
दुसरीकडे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या गटाने समर्थकांच्या दोन जागा तर खा. निलेश लंके यांनी स्वतःची जागा जिंकून बँकेत सफाईदार शिरकाव केला. बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या कन्या संजीवनी शिंदे-गायकर यांनी स्वतंत्रपणे लढत विजय मिळवताना अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावर मात केली.
बँकेच्या संचालक मंडळात आता एक खासदार व चार आमदार आले आहेत. 21 जागांपैकी विजयी संचालकांमध्ये विखे-थोरात आणि गडाख गटाचे 17 जण असल्याने त्यांचे वर्चस्व झाले असले तरी यंदाच्या निवडणुकीत सभापती शिंदे यांचा दोन समर्थकांद्वारे व खा. लंके यांचा स्वतःच्या रुपाने शिरकाव झाल्याने विरोधकांचा हा अंकुश प्रभावी राहणार का? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अकोलेत विद्यमान आमदार डॉ. लहामटे यांचा पराभव झाला असून यंदाच्या संचालक मंडळात चार जुन्या चेहर्यांना पुन्हा संधी मिळालेली असून यात माजी मंत्री शंकरराव गडाख, आ. मोनिकाताई राजळे, अनुराधा नागवडे आणि गणपतराव सांगळे यांचा यात समावेश आहे. तर यंदा बँकेत तब्बल 17 नवीन चेहर्यांचा समावेश राहणार आहे. बँकेच्या राखीव असणार्या अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या चिरंजीव प्रशांत लोखंडे यांना पराभव पत्कारावा लागला. महिला राखीव मतदारसंघात हर्षदा काकडे यांनी चांगली लढत दिली. मात्र, त्यांना 1 हजार 489 मते मिळाली.
जिल्हा सहकारी बँकेचे 3 हजार 837 सभासद प्रतिनिधी मतदार होते. त्यापैकी 3 हजार 809 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागा आहेत. दुष्काळी स्थितीमुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले होते. त्यास विखे-थोरात यांनी प्रतिसाद दिला. शिंदेही यात आधी सहभागी झाले. त्यांच्यामुळे खा. लंकेही यात आले. मात्र, ऐनवेळी बिनसले. शिंदेंनी विश्वासात घेतले नसल्याचा दावा करीत पालकमंत्री विखे व थोरातांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. तर खा. लंके यांना अपेक्षेप्रमाणे दूर ठेवले गेले होते. परिणामी, विखे-थोरात आणि गडाख यांच्या सहकार विकास पॅनेल, खा. लंके व माजी खा. सदाशिव लोखंडेंचे सहकार परिवर्तन पॅनेल व शिंदे यांचे स्वतंत्र चार उमेदवारांचे पॅनेल रिंगणात होते. विखे-थोरात आणि गडाखांच्या सहमती एक्सप्रेसमध्ये सोसायटी मतदारसंघात 9 व बिगर शेतीची एक अशा 10, शिंदे यांनी एक जागा बिनविरोध काढली होती.
मंगळवारी झालेल्या मतमोजणी शेती पूरकमधून आ. आशुतोष काळे, सोसायटी मतदारसंघातू खा. लंके, अकोल्यातून संजीवनी शिंदे तर कर्जतमध्ये ज्योती शिंदे, आ. प्राजक्त तनपुरे विजयी ठरले. तर राखीव गटात अनुराधा नागवडे, संगिता वाघ, गणपत सांगळे, वैभव पिचड आणि कारभारी जावळे विजयी झाले. यंदाच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ओबीसी मतदारसंघातून सर्वाधिक 1 हजार 943 मतांना गडाख यांचे समर्थक कारभारी गवळी यांचा विजय झाला आहे.
असा लागला दहा जागांचा निकाल
सोसायटी मतदार संघ : अकोले आ. डॉ. किरण लहामटे-36) व संजीवनी शिंदे-गायकर 49. (आ. लहामटे 13 मतांनी पराभूत. शिंदे स्वतंत्र उमेदवार, पण विखे-थोरात समर्थक) कर्जत – तुषार पिसाळ 20 व ज्योती शिंदे-54 (ज्योती शिंदे 34 मतांनी विजयी. (सभापती शिंदे गटाच्या उमेदवार). पारनेर- खा. निलेश लंके-64 व राहुल शिंदे 40 (खा. लंके 24 मतांनी विजयी, लंके-लोखंडे गटाचे उमेदवार). राहुरी आ. प्राजक्त तनपुरे 89 व सत्यजित कदम 18 (आ. तनपुरे 71 मतांनी विजयी). थोरात विखे गट. थोरात समर्थक). शेतीपूरक मतदार संघ आ. आशुतोष काळे 750 व सुधीर म्हस्के-123 (आ. काळे 627 मतांनी विजयी. थोरात गट उमेदवार) या गटात 8 मते बाद झाली. महिला राखीव (दोन जागा) मतदार संघ अनुराधा नागवडे व संगीता वाघ, अनुसूचित जाती जमाती मतदार संघ माजी आमदार वैभव पिचड, इतर मागासर्वओबीसी मतदार संघ कारभारी जावळे, भटके विमुक्त मतदार संघ गणपतराव सांगळे (दोन्ही विखे थोरात व गडाख गट) यांचा समावेश आहे.
आ. काळे आणि आ. तनपुरे यांचा एकतर्फी विजय
शेतीपूरक मतदारसंघातून कोपरगाव आमदार आशुतोष काळे यांनी विरोधी उमेदवार सुधीर म्हस्के यांचा एकतर्फी पराभव केला. या मतदारसंघात काळे यांना 750 मते मिळाली तर विरोधी उमेदवार सुधीर म्हस्के यांना अवघी 138 मते मिळाली. तर राहुरी सोसायटी मतदारसंघात आ. प्राजक्त तनपुरे यांना 89 मते मिळाली तर कदम यांना अवघी 18 मते मिळाली.
मतपत्रिकेसोबत सहकारातील घराणेशाहीबाबत चिठ्ठी
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एका मतदाराने मतदान करताना मतपत्रिकेसोबत चिठ्ठीही मतदान पेटीत टाकल्याचा प्रकार समोर आला. संगमनेर तालुक्यातील या मतदाराने मतपत्रिकेला स्टेपल करून चार ते पाच ओळींचा मजकूर असलेली चिठ्ठी जोडली होती. दुष्काळाचे गोंडस नाव पुढे करून लोकशाहीची हत्या करीत एकत्र आलेल्यांना धडा शिकविण्याचे आवाहन या चिठ्ठीत करण्यात आले होते. त्यात नेत्यांबद्दल आक्षेपार्ह शब्दाचाही वापर करण्यात आला होता.निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी मतपत्रिकेची पाहणी केली. मतपत्रिकेवर नियमानुसार मतदान झालेले असल्याचे स्पष्ट झाल्याने केवळ कोपर्यात स्टेपल केलेली चिठ्ठी बाजूला काढण्यात आली आणि संबंधित मतपत्रिका वैध ठरविण्यात आली.
यंदा जिल्हा बँके पाच महिला संचालक
यंदाच्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महिला राखीव मतदारसंघ वगळता सोसायटी मतदारसंघातून तीन महिला विजयी झाल्या आहेत. यामुळे महिला राखीव मतदारसंघातील दोन आणि सोसायटी मतदारसंघात तीन अशा प्रकारे जिल्हा बँकेत पाच महिला संचालक झाल्या आहेत. यामुळे खर्याअर्थाने जिल्ह्याच्या ग्रामीण आर्थिक विकासात महिलांचा सहभाग वाढणार आहे.
बाळासाहेब थोरात माझे नेते
खासदार लंके व काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीत एकत्र आहेत. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीत थोरात यांनी लंके यांच्या विरोधी पॅनलचे नेतृत्व केले. यासंदर्भात बोलताना लंके म्हणाले थोरात कालही माझे नेते होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. पदाधिकारी निवडीत आवश्यकता भासल्यास आपण थोरात व राम शिंदे यांच्यासोबत जाऊ.
बँकेचे नवनिर्वाचित संचालक- सोसायटी मतदार संघ- जामखेड सचिन घुमरे, अहिल्यानगर तालुका आ. अक्षय कर्डिले, कोपरगाव- बिपीन कोल्हे, नेवासा माजी मंत्री शंकरराव गडाख, पाथर्डी आ. मोनिकाताई राजळे, राहाता माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, संगमनेर रणजितसिंह देशमुख, शेवगाव माजी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, श्रीरामपूर नगराध्यक्ष करण ससाणे व श्रीगोंदे दत्ता पानसरे, अकोले संजीवनी शिंदे, कर्जत ज्योती प्रकाश शिंदे, राहुरी- आ. प्राजक्त तनपुरे, पारनेर खा. नीलेश लंके. शेतीपूरक मतदार संघ- आमदार आशुतोष काळे, बिगर शेती संस्था मतदार संघ- सचिन जगताप, महिला राखीव मतदारसंघ- अनुराधा नागवडे व संगीता वाघ, अनुसूचित जाती-जमाती मतदार संघ- माजी आ. वैभव पिचड, इतर मागासवर्गीय मतदार संघ- कारभारी जावळे, भटके विमुक्त मतदार संघ- गणपतराव सांगळे.




