अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार विकास आघाडीने मोठे यश संपादन केले. आता अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने अंतिम होईल, असे सांगत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सर्वांना विश्वासात घेऊन बँकेचा कारभार केला जाईल, अशी ग्वाही दिली.
मंगळवारी (दि.3) जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित संचालक आ. आशुतोष काळे, सचिन जगताप, वैभव पिचड, राजश्री घुले पाटील, रणजीतसिंह देशमुख, कारभारी जावळे, संगीता वाघ, करण ससाणे, दत्तात्रय पानसरे, गणपतराव सांगळे, अनुराधा नागवडे यांच्यासह माजी आमदार चंद्रशेखर घुले, सिताराम गायकर आदी उपस्थित होते.
जिल्हा बँकेतील विजयाचे खरे श्रेय जिल्ह्यातील मतदारांना जाते. बँकेची निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न करूनही यश आले नाही आणि शेवटी निवडणुक झाली, तरी त्याकडे फार मोठी घटना म्हणून पाहण्याची गरज नाही. सहकार क्षेत्रात निवडणूक होणे ही लोकशाही प्रक्रियेचाच एक भाग आहे. या निवडणुकीत कुठेही चिखलफेक किंवा वैयक्तिक टीका झाली नाही, ही समाधानाची बाब आहे. निवडणुकीनंतर सर्वांनी एकत्र येऊन जिल्हा बँकेच्या विकासासाठी काम करणे महत्त्वाचे असल्याचेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
पारनेरच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली
पारनेर सोसायटी मतदारसंघातील निकालाबाबत बोलताना डॉ. विखे यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. ते म्हणाले की, पारनेरमध्ये एका बाजूला खासदार आणि दुसर्या बाजूला सर्वसामान्य कार्यकर्ता अशी लढत होती.या ठिकाणी माझा उमेदवार पराभूत झाला असून, त्याची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो. त्याचबरोबर पारनेरमधील विजयाबद्दल खासदार नीलेश लंके यांचे अभिनंदन करतो, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येकाला वाटते अध्यक्ष व्हावे
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत विचारले असता डॉ. विखे पाटील म्हणाले की, अध्यक्षपदासाठी 18 संचालक इच्छुक असू शकतात. प्रत्येकाला वाटते आपण अध्यक्ष व्हावे, मात्र काही बोलतात तर काही बोलत नाही. मात्र, सहकार विकास आघाडीमध्ये याबाबत जो निर्णय घेतला जाईल, तो सर्व जेष्ठ नेते आणि संचालकांच्या संमतीनेच होईल. कोणताही निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेतले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पसंतीनेच अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.




