अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्याच्या सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जाणार्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज, सोमवार (दि. 2) मतदान होत आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी केलेले प्रयत्न अपयशी ठरल्याने दहा जागांसाठी 27 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. खासदार, आमदार, माजी आमदारांसह राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे भवितव्यही आज मतपेटीत बंद होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. उद्या, मंगळवारी मतमोजणीनंतर कोणाला संचालकपदाची संधी मिळणार आणि कोणाला पराभवाचा धक्का बसणार, हे स्पष्ट होईल.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील सहकारातील सर्व बड्या नेत्यांनी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, जिल्ह्यातील राजकीय सत्ता संतुलनाच्या प्रयत्नात बँकेच्या काही जागा बिनविरोध होऊ शकले नाहीत. आता या दहा जागांसाठी आज मतदान होणार असून यात सभासद कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अकोले सोसायटी मतदारसंघातून विद्यमान आ. डॉ. किरण लहामटे, राहुरी सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री तथा विद्यमान आ. प्राजक्त तनपुरे, शेतीपूरक व शेतमाल सहकारी संस्था मतदारसंघातून आ. आशुतोष काळे, पारनेर सोसायटी मतदारसंघातून खा. निलेश लंके हे निवडणूक रिंगणात आहेत.
त्यांच्यासोबतच अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून माजी आ. वैभव पिचड, राहुरीतून माजी आ. चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव सत्यजित कदम तर अनुसूचित जमाती मतदारसंघातून माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी कोणत्या नेत्याला जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी संस्था असणार्या जिल्हा बँकेत प्रवेश मिळणार याकडे राज्याची लक्ष राहणार आहे. यासह निवडणुकीत जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सिताराम पाटील गायकर यांची कन्या संजीवनी गायकर शिंदे अकोले सोसायटी मतदारसंघातून, नवख्या ज्योति शिंदे कर्जत सोसायटी मतदारसंघातून, राहुल शिंदे पारनेर सोसायटी मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहे, तर शेतीपूरक व शेतमाल सहकारी संस्था मतदारसंघातून सुधीर म्हस्के हे आ. काळे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. महिला राखीव मतदारसंघात दोन जागांसाठी बँकेच्या माजी संचालिका अनुराधा नागवडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामनाथ वाघ यांच्या स्नुषा संगीता वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे, नवख्या संध्या महांडुळे, सुवर्णा पाचपुते यांच्यासह पुष्पा गायकवाड निवडणूक रिंगणात आहेत.
ओबीसी मतदारसंघातून कारभारी जावळे, माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, जामखेड येथील पतसंस्थेचे अध्यक्ष आजिनाथ हजारे, तर नवखे शिवदास गुंजाळ व कडूचंद शेटे निवडणूक लढवत आहेत. विजाभज मतदारसंघातून बँकेचे माजी संचालक गणपतराव सांगळे यांचे विरोधात ज्येष्ठ नेते प्रताप ढाकणे यांची चिरंजीव ऋषिकेश ढाकणे यांच्यासह सुभाष गीते निवडणूक लढवत आहेत.
हे झालेले आहेत बिनविरोध
यापूर्वी जिल्हा बँकेवर आ. मोनिकाताई राजळे, आ. अक्षय कर्डिले, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, ज्येष्ठ नेते बिपिनदादा कोल्हे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले पाटील, माजी संचालक करण ससाने, संगमनेरचे रणजीत देशमुख आणि दत्तात्रय पानसरे यासह जामखेडमधून सचिन घुमरे बिनविरोध निवडून आलेले आहेत. तसेच बिगर शेती मतदारसंघातून सचिन जगताप हे जिल्हा बँकेत अविरोध निवडून आलेले आहेत.
बँकेतील राजकीय पक्षनिहाय स्थिती
भाजप पाच संचालक बिनविरोध तर 10 निवडणूक रिंगणात शिवसेना शिंद गट शून्य संचालक बिनविरोध आणि 3 निवडणूक रिंगणात, राष्ट्रवादी अजित पवार गट 3 संचालक बिनविरोध तर 4 निवडणूक रिंगणात, राष्ट्रवादी शरद पवार गट शुन्य संचालक बिनविरोध तर 3 निवडणूक रिंगणात, काँग्रेस 2 बिनविरोध तर 2 निवडणूक रिंगणात, शिवसेना उबाठा 1 संचालक बिनविरोधत तर 1 निवडणूक रिंगणात.
उद्या मतमोजणी; निवडणुकीची तयारी पूर्ण
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाची तयारी पूर्ण झाली असून आज जिल्ह्यातील 14 तालुक्यासह नगर शहर या ठिकाणी 33 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्यानंतर उद्या नगर शहराजवळील कल्याण रोडवरील मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी दिली.
मतपेट्या नगरच्या स्टँगरूमध्ये ठेवणार
सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. मतदानाला येताना मतदाराने निवडणूक प्राधिकरणाने दिलेल्या यादीमधील फोटो असलेले ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक असणार आहे. मतदान केंद्रामध्ये मोबाईल व कोणताही इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस नेण्यास बंदी आहे. मतदान केंद्राच्या शंभर मीटर आतमध्ये जमावबंदी व शस्त्र नेण्यास बंदीबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश काढलेले आहेत. मतदान झाल्यानंतर मतपेटी उपस्थित प्रतिनिधींच्या समक्ष सील करून अहिल्यानगर येथे अमरज्योत लॉन्स, नगर कल्याण रोड, नेप्ती येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार असून स्ट्राँग रूममध्ये सीसीटीव्ही व सुरक्षितेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
गत पंचवार्षिकपेक्षा यंदा तगडी लढत
जिल्हा बँकेत 2021 ला झालेल्या निवडणुकीत माघारीच्या वेळी संचालक मंडळाच्या 21 पैकी 17 जागा बिनविरोध निघाल्या होत्या. तर बिगर शेती, नगर, पारनेर आणि कर्जत सोसायटी मतदारसंघासाठी निवडणूक झाली होती. त्यावेळी बिगर शेती मतदारसंघात चुरशीची निवडणूक होवून प्रशांत गायकवाड निवडून आले होते. त्यावेळी दिवंगत नेते अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. निवडणुकीच्या निकालानंतर बँकेत बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली 19 संचालक निवडून आले होते. तर विखे गटाच्या अवघ्या तीन जागा निवडून आल्या होत्या.
मतदारसंघनिहाय मतदार
अकोले सोसायटी मतदारसंघ 85, कर्जत सोसायटी 75, पारनेर सोसायटी 104, राहुरी सोसायटी 107, शेतीपूरक 884 आणि महिला राखीव, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गी मतदारसंघ आणि विजाभज राखीव मतदारसंघात प्रत्येकी 3 हजार 836 मतदार आहेत.




