Monday, November 2, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपूरकरांना दिलासा; भंडारदर्‍याचे आवर्तन 15 दिवस आधी

Shrirampur : श्रीरामपूरकरांना दिलासा; भंडारदर्‍याचे आवर्तन 15 दिवस आधी

1 डिसेंबरला पाणी सोडणार, आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा || 15 टँकरची मागणी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा धरणातून 15 डिसेंबरला सोडण्यात येणारे आवर्तन आता 1 डिसेंबरला सोडण्यास जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्यता दिली आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे श्रीरामपूरकरांना दिलासा मिळाला असून, आता शहराला आठवड्यातून सोमवार आणि गुरुवार असा दोन दिवस पाणीपुरवठा केला जाणार आहे. अशी माहिती आमदार हेमंत ओगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

काल नगरपालिकेच्या सभागृहात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद पार पडली. यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, मुजफ्फर शेख, आशिष धनवटे, दिलीप नागरे, योगेश जाधव, दीपक वमने, श्याम अडांगळे, लकी सेठी, वैशाली चव्हाण आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आ. ओगले यांनी सांगितले की, शहरातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन पालकमंत्री विखे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर आवर्तनाची तारीख 15 दिवसांनी अलिकडे आणण्याचा निर्णय झाला. डॉ. सुजय विखे पाटील यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराशी चर्चा करून काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असून, कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्याचेही ठरविले आहे. 90 कोटी लिटर क्षमतेच्या संतुलन जलकुंभाचे काम 15 फेब्रुवारीपर्यंत, तर संपूर्ण योजना 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

तातडीच्या उपाययोजनांमध्ये मोठ्या वस्त्या व झोपडपट्टी भागांत पाच हजार लिटर क्षमतेच्या सुमारे 25 टाक्या बसविण्यात येत आहेत. बंद बोअरवेल दुरुस्तीसाठी पालिकेबरोबरच चार पथके कार्यरत असून, 5 नोव्हेंबरपर्यंत दुरुस्तीचे उद्दिष्ट आहे. पालिकेच्यावतीने सध्या सहा टँकर सुरू असून आणखी 15 टँकर उपलब्ध करून घेण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी केली आहे. आमदार निधीतून 15 लाख रुपये पाणीटंचाईवरील उपाययोजनांसाठी दिले जाणार आहेत. श्रीरामपूर मतदारसंघातील 86 गावे आणि श्रीरामपूर व देवळाली नगरपालिकांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाणार असून यासाठी निधी राखीव ठेवल्याचे ओगले यांनी सांगितले. शहराच्या साठवण तलावासह दिघी, शिरसगाव आणि बेलापूरचे साठवण तलाव भरून घेण्याचे नियोजन आहे.

भविष्यातील वाढणारी एमआयडीसी, शहर यांची पाण्याची गरज लक्षात घेवून स्व. जयंत ससाणे यांच्या कार्यकाळात भंडारदरा धरणातील पाण्याबरोबरच मुळा धरणातूनही पाणी उपलब्ध करून घेण्याचा प्रस्ताव होता. मुख्यमंत्र्यांनीही या प्रस्तावावर अनुकूल शिफारस केली असल्याचे ओगले यांनी सांगितले. नगराध्यक्ष करण ससाणे यांनी आठ दिवसांनी पाणीपुरवठ्याच्या नियोजनामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सध्या पालिकेचे पाच टँकर सुरू असून, स्व. जयंत ससाने मित्र मंडळाच्यावतीने आणखी पाच टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. आगामी काळात आवर्तनांमधील खंड लक्षात घेता नागरिकांनी पाण्याची काटकसरीने वापर करून साठवणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले. नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांनी दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची भूमिका मांडली. नागरिकांना गरजेनुसार टँकरची मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

व्याकूळ श्रीरामपूरकरांच्या उपोषणाची दखल घेत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटलांनी रोटेशन लवकर सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच साठवण तलावाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला आदेश दिल्याची माहिती व्याकूळ श्रीरामपूरकरचे संयोजक केतन खोरे, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांनी दिली.यामुळे श्रीरामपूरकरांना एप्रिल-मे 2027 मध्ये पाण्याचा तुटवडा जाणवणार नसल्याची अपेक्षा व्यक्त करत ना. विखे पाटील व सुजय विखे पाटील यांचे आभार माजी उपनगराध्यक्ष रविंद्र गुलाटी, सचिन बडदे, शशांक रासकर, राजेश अलघ, अर्जुन करपे, तिलक डुंगरवाल, रूपेश हरकल, शंकर चव्हाण, योगेश ओझा, विजय आखाडे यांनी मानले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या 10 जागांसाठी आज मतदान

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्याच्या सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जाणार्‍या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज, सोमवार (दि. 2) मतदान होत आहे. बँकेची निवडणूक...