अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीची केंद्र शासनाकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली असून दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे तीन सदस्य पथक शुक्रवार (दि. 9) ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहे. पथकाकडून जिल्ह्यातील विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन दुष्काळी परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शेतीवरील परिणाम तसेच आवश्यक उपाययोजनांची पाहणी करण्यात येणार आहे. प्रमुख्याने हे पथक नगर आणि कर्जत तालुक्यातील पिकांची आणि शेतीची पाहणी करणार आहेत.
जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीची वस्तुस्थिती केंद्र शासनाच्या पथकाला प्रत्यक्ष पाहता यावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाच्या यंत्रणांकडून आवश्यक माहिती पाणी पथकाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पथकाकडून विविध ठिकाणी भेटी देऊन स्थानिक परिस्थितीची पाहणी तसेच संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली जाणार आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवठ्याचे नियोजन, टँकरद्वारे पाणीपुरवठा, उपलब्ध जलस्रोतांची स्थिती आदी बाबींचीही पाहणी होणार आहे.
त्याचबरोबर पावसाअभावी शेतीपिकांवर झालेला परिणाम, पीक नुकसानीचे पंचनामे, चारा उपलब्धता आणि पशुधनासाठी आवश्यक उपाययोजना याबाबतची वस्तुस्थितीही पथकाच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे. केंद्र शासनाचे पथक जिल्ह्यातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून त्याचा सविस्तर अहवाल केंद्र शासनाला सादर करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, त्याची तीव्रता आणि आवश्यक मदतीबाबतची वस्तुनिष्ठ माहिती केंद्र शासनापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. या पाहणी पथकात केंद्र सरकारचे तीन प्रतिनिधी राहणार आहेत.




