Sunday, November 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजवृद्ध महिलेचे दागिने हिसकावणारा संशयित जेरबंद; गुन्ह्यातील दुचाकीही जप्त

वृद्ध महिलेचे दागिने हिसकावणारा संशयित जेरबंद; गुन्ह्यातील दुचाकीही जप्त

घोटी | जाकीर शेख Ghoti

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व कानातील दागिने जबरीने चोरून नेल्याच्या घटनेत घोटी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत धडक कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली असून, घोटी पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.२० वाजण्याच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील ७० वर्षीय हिराबाई कोकणे या मुंबई-आग्रा महामार्गावरून आडवणच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने बळजबरीने हिसकावून पोबारा केला. या चोरीत सुमारे ३७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते.

घटनेची माहिती मिळताच संबंधित महिलेने डायल ११२ वर संपर्क साधला. यानंतर घोटी पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस पथकाने अवघ्या दोन तासांत संशयित आरोपी संकेत कैलास चंद्रमोरे (वय १८, रा. बितुरली , ता. इगतपुरी) याला ताब्यात घेतले. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली एमएच १५ केपी ९७९४ क्रमांकाची दुचाकीही जप्त केली आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुरनं. ३८७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रतीक भिंगारदे, पोलीस अंमलदार परीक्षित इगळे, सागर सौदागर, सुनील पाटील, सनी भवर, संतोष नागरे तसेच गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार प्रकाश कासार यांच्या पथकाने केली.

नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा : विजय शिंदे
घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोणतीही चोरी, जबरी चोरी अथवा संशयास्पद घटना घडल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ डायल ११२ किंवा घोटी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. नागरिकांनी वेळेत माहिती दिल्यास पोलिसांना गुन्हेगारांचा माग काढणे आणि गुन्हे उघडकीस आणणे अधिक सोपे होते. पोलिसांच्या तत्परतेमुळे अल्पावधीत गुन्ह्याचा तपास लागल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Pathardi : भगवानगडाच्या पायथ्याशी विहिरीत आढळले आठ दुचाकीचे सांगाडे

0
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या (Bhagwangad) पायथ्याशी घोगस पारगाव रस्त्यालगत असलेल्या जुन्या विहिरीमध्ये (Well) तब्बल आठ दुचाकीचे सांगाडे व अवशेष आढळून आल्याने...