अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरात काल लाडक्या गणरायाचे अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात आगमन झाले. दिवसभर शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात बाप्पा मोरयाचा जयघोष दुमदुमला होता. रात्रीपर्यंत हा जल्लोष सुरू होता. कुठे फुलांनी सजविलेल्या वाहनातून गणरायाची मूर्ती घराकडे निघाली होती; तर कुठे पारंपरिक वेशभूषेत कुटुंबीय मूर्ती घेऊन जाताना दिसत होते. छोट्या-मोठ्या घरांच्या उंबरठ्यांवर रांगोळ्यांची नक्षी, तोरणांची आरास आणि फुलांची उधळण होत होती.
मंगलमय वातावरणात विधिवत पूजाअर्चा, आरती आणि मंत्रोच्चारांच्या साथीने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी विविध गणेश मंडळांनी आकर्षक सजावट, फुलांची आरास आणि विद्युत रोषणाई केली होती. ढोल-ताशा, हलगी व पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाच्या मूर्ती मंडपात आणण्यात आल्या. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी डिजेला बंदी असल्याने पारंपारिक वाद्याला अनेक मंडळांनी पसंती दिली. सर्व पक्षाचे नेते, चित्रपट अभिनेते, अभिनेत्री, उद्योगपती सर्वांनीच आपापल्या घरी बाप्पांची प्रतिस्थापना केली.
चांगला पाऊस पडू दे…
बाप्पा येणार या आनंदात गेल्या अनेक दिवसांपासून भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत होते. काल घरीही सहकुटुंब भक्तिभावाने श्री गणरायाची पूजा व आरती करून बाप्पांचे मनोभावे स्वागत करण्यात आले. चांगला पाऊस पडू दे, शेतकरी राजाच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून त्यांच्या कष्टाला यश, जीवनात सुख-शांती आणि समृद्धी लाभू दे, अशी प्रार्थना अनेकांनी श्री गणरायाकडे केली.




